‘वंदे भारत’ने दोन कोटी प्रवाशांचा प्रवास

देशातील अत्याधुनिक सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. ‘वंदे भारत’ ट्रेनने 31 मार्चपर्यंत दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱयांनी दिली.

देशात प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली, त्याला आज 171 वर्षे पूर्ण झाली. 16 एप्रिल 1853 साली पहिली प्रवासी ट्रेन मुंबई ते ठाणेदरम्यान धावली. तेव्हापासून ‘वंदे भारत’पर्यंतचा टप्पा हिंदुस्थानी रेल्वेने गाठला आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन दिल्ली आणि वाराणसी दरम्यान सुरू झाली. आज देशात 102 वंदे भारत ट्रेन 100 वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. 24 राज्य आणि पेंद्रशासित प्रदेशांतील 284 जिह्यांतून या ट्रेन धावत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात ‘वंदे भारत’ने कापलेले अंतर हे पृथ्वीला 310 परिक्रमा करण्याइतके आहे, अशी माहिती रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे अधिकाऱयाने दिली. ‘वंदे भारत’ म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवेतील ‘मेक इन इंडिया’चा प्रयोग असल्याचे रेल्वे अधिकाऱयाने सांगितले.

सध्या वंदे भारतची गती 130 किमी प्रति तास आहे, ती वाढवून 160 किमीपर्यंत करण्याची तयारी आहे. त्यासाठी सिस्टीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत.

विमानासारख्या हायफाय सुविधा
‘वंदे भारत’ ट्रेनने विमानासारखा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा आरामदायी प्रवास करता येतो. ट्रेनचा वेग, आरामदायी सीट्स, साऊंडप्रूफ कोच, वायफाय सर्विस, जीपीएस आधारित प्रवासी माहिती यंत्रणा, पँट्री सुविधा, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी काचेच्या मोठय़ा खिडक्या आदी बाबींमुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळत आहे.

लवकरच स्लीपर ट्रेन
‘वंदे भारत’च्या स्लीपर ट्रेन लवकरच येणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर ट्रेन सोयीच्या असतील. अलीकडेच रेल्वे मंत्र्यांनी बंगळुरू येथील रेल्वे युनिटला भेट देऊन स्लीपर ट्रेनच्या रचनेची पाहणी केली होती.