
सामना ऑनलाईन । मुंबई
वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये वेगवेगळे चित्रपट केले जातात मात्र मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट पाहायला मिळणं तसं दुर्मिळच. मात्र आता प्राणीप्रेमावर आधारलेला ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी ऍण्ड चॉकलेट’ हा मराठी चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
निसर्गरम्य माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्याकरून सैर घडवून आणणारे बाबू पवार त्यांची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’सोबतच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दा हा चित्रपट अधोरेखित करतो. चित्रपट माध्यमातून हा मुद्दा ठळकपणे समाजापुढे येईल या उद्देशाने या चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ सांगतात.




























































