आयसीसीची टी-20 क्रमवारी जाहीर, हसरंगा, शाकिब संयुक्तपणे आघाडीवर

श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा व बांगलादेशचा शाकिब अल हसन आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. या क्रमवारीत हिंदुस्थानचा हार्दिक पंडय़ा सातव्या स्थानी कायम असून, सूर्यकुमार यादवनेही फलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थान राखले.

हसरंगा आणि शाकिब हे प्रत्येकी 228 गुणांसह आयसीसीच्या ताज्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले. अफगाणिस्तानचा मोहमद नबी 218 गुणांसह तिसऱया स्थानी असून, सातव्या स्थानी असलेल्या पंडय़ाच्या खात्यात 185 गुण जमा आहेत. या क्रमवारीत झिम्बाब्वेचा सिपंदर रझा (210), दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम व ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोईनिस अनुक्रमे चार ते सहा क्रमांकावर आहेत.
आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत हिंदुस्थानचा सूर्यकुमार यादव 861 गुणांसह अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट (802) दुसऱया, तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (781) तिसऱया स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (761), दक्षिण आफ्रिकेचा मार्करम (755) व हिंदुस्थानचा यशस्वी जैसवाल (714) अनुक्रमे चार ते सहा क्रमांकावर आहेत. गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा व वेस्ट इंडीजचा अकिल हुसैन अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. हिंदुस्थानचा अक्षर पटेल या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे.