
सामना प्रतिनिधी । येवला
रविवारी रात्री वाळूमाफियांनी ममदापूर शिवारातील वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या सोनार नाल्यातून वाळू चोरत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर आठ ते दहा वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. तर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर वनविभागाने एक ट्रक्टर जप्त केला आहे.
राजापूर व परिसरातील वनविभागाचे हजोरो हेक्टर क्षेत्र आहे. तेथून शेजारच्या तालुक्यातून वाळू चोरी होते. महसूल व पोलीस प्रशासनाचे वचक राहिले नसल्याने वाळू माफियांना ऊत आला आहे. त्यामुळे वाळू चोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सदरची घटना ममदापूर वनविभागाच्या हद्दीत सोनार नाला येथे काल रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या पथकाला सोनार नाला येथून काही वाळूमाफिया वाळूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राजापूर येथील वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूमाफियांनी थेट वनरक्षक, वॉचमन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात वनरक्षकांचे एक नातेवाईक जबर जखमी झाले आहेत तर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना दुखापत झाली आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वाळू पकडलेल्या आरोपींना कठोर कारवाई करण्यात येऊन आमच्या कर्मचाऱयांना यापुढे संरक्षण देण्यात येईल. एक टॅक्टर जप्त असून दुसरा टॅक्टर जप्त करण्यात येणार आहे. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल.
– डॉ. एस. शिवबाला, उपवनसंरक्षक, पूर्वभाग





























































