कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप, नियोजन शून्य आयोजनामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती; अनेकजणी बेशुद्ध

वर्ध्याच्या हिंगणघाट येथील अनुसुया मंगल कार्यालयामध्ये कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा कीटचे वाटप होत आहे. यावेळी महिलांनी एकच गर्दी केली होती. कामगार कल्याण विभागामार्फत कार्यक्रमाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. वीस हजारांच्या वर महिला एकत्र जमल्याने एकच झुंबड निर्माण झाली असून या चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीत अनेक महिला बेशुद्ध झाल्याचे देखील समोर आले आहे. सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे.

काल रात्री आठ वाजल्यापासून हे साहित्य घेण्यासाठी महिला या ठिकाणी जमलेल्या असून, बाहेर असलेल्या महिलांना पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध नाही.. नियोजनाचा अभाव आहे. भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी या कार्यक्रमाचे श्रेय घेण्याच्या दृष्टीकोनातून म्हणून जागोजागी बॅनर लावले व किचन वाटप करण्याबाबतचे मेसेजेस देखील पाठवविले असल्याच महिला बोलत आहे. या मेसेजेसच्या माध्यमातूनच तालुक्यातून महिलांनी मोठी गर्दी केली मात्र या महिलांच्या व्यवस्था.. सोई बाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. साध्या पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने अनेक महिला बेशुद्ध पडत आहेत. चेंगराचेंगरी होण्या सारखी परिस्थिती या जागी निर्माण झाली असून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहे.

आपली मुलं घेऊन, मजुरी सोडून भाड्याने गाड्या करून आलेल्या या महिला टोकन न घेता परत जाण्यासाठी तयार नाहीत. यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला असून नियोजन शून्यतेमुळे लाडक्या बहिणीचे हाल होत आहे. कामगार कल्याण विभागाचे अधिकारी व आमदार समीर कुणावर तिथे उपस्थित नाहीत. अनेक महिलांकडून यावेळी दलालांबाबत देखील बोलल्या जात असून दीड दीड हजार रुपये दलाली देऊन आम्ही आमचा नंबर लावून घेतला असे देखील महिला आरोप करत आहेत. नंबर लावण्यासाठी दीड हजार रुपये कमिशन , येण्यासाठी म्हणून केलेल्या दोन दोन हजार रुपयांच्या गाड्या व आपल्या शेतीचे काम तर मोलमजुरी सोडून आलेल्या या लाडक्या बहिणी होणाऱ्या गैरसोयीने प्रचंड संतापलेल्या आहेत. आक्रमक झालेल्या या महिला आता टोकन घेतल्याशिवाय जाणार नाही अशा बोलत आहे व आयोजकांकडून सर्व महिलांना घरी परत जाण्याचे आवाहन केले जात आहे..