
25 डिसेंबर म्हणजे नाताळचा सण अर्थात ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ख्रिस्ताचा जयंती सोहळा. जगभरातले ख्रिस्ती बांधव हा सण उत्साहाने साजरा करतात. ऐन हिवाळ्यात सोबत मिश्कील चेहऱ्याच्या लालेलाल कपडे घालून येणाऱ्या नाताळबाबा अर्थात सांताक्लॉजला घेऊन येणारा हा सण हिंदुस्थानातही ठिकठिकाणी साजरा होतो. महाराष्ट्रात मुंबईसह वसईतही तो साजरा होतो, पण अगदी वेगळ्या आणि मराठमोळ्या ढंगात.
नाताळची चाहूल लागली की वसईचं सांस्कृतिक वातावरण बदलायला लागतं. हिरव्या वसईच्या वातावरणाला नाताळच्या स्वरलहरींच्या संगीताची जोड मिळाली की इकडचं वातावरण बेधुंद होतं. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईत फार पूर्वीपासून ख्रिस्ती समाजात नाताळच्या सणाला अध्यात्म आणि उत्साहाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.
वसईत दोन आठवडे आधीपासूनच कॅरल्स (नाताळगाणी) ना सुरुवात होते. कॅरोलियन या ग्रीक शब्दापासून तयार झालेल्या कॅरल म्हणजे गोलाकार उभे राहून गाणी म्हणणे, नृत्य करणे. रोममध्ये चौथ्या शतकात सर्वप्रथम कॅरल झाल्याचे पुरावे सापडतात. ती गाणी वसईत कोळी, वाडवळी, आगरी, मालवणी, सामवेदी, मराठी अशा विविध भाषांमध्ये गायली जातात. तरुणांचा चमू वाद्ये घेऊन चर्च परिसरात, गावागावात, चौकात कॅरल्स गात सणाची पूर्वतयारी करतात. 25 डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्री सर्वजण रंगीबेरंगी, उंची पोशाख करून चर्चमध्ये प्रार्थनेला जातात. चर्चमध्ये आकर्षक रोषणाई केली जाते, फुलांची आरास आणि मेणबत्त्यांचा धूर असं सगळं संमिश्र वातावरण तयार झालेलं असतं. पार्श्वभूमीला कॅरल्स असतातच. अशा या वातावरणात ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये रात्रीच्या मिस्साला येतात. वसईतील सर्व चर्चेसमधून मिस्सा अस्सल मराठी भाषेत सादर केले जातात. फक्त मिस्साच नव्हे तर नाताळची चर्चमधली पहिली प्रार्थना, कॅरल्स इत्यादी सर्व मराठीत असते.
एका गायीच्या गोठ्यात येशूचा जन्म झाला, या घटनेला खूप मोठा सांकेतिक अर्थ आहे. गरीब, दुःखी, त्रस्त, अन्यायग्रस्त, शोषित महिला यांच्या संदर्भात तो अर्थ आहे. त्यामुळे गायीच्या गोठ्यात येशूच्या जन्माची तयारी केली जाते. कोणत्याही सणासुदीला जसा फराळ केला जातो, तसाच फराळ नाताळात केला जातो. गंमत म्हणजे वसईत साजऱ्या होणाऱ्या नाताळासाठी दिवाळीत करतात तश्या चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळी असे पदार्थ केले जातात. सोबत डाळ हलवा, पेरू हलवा, कलकल, केक, मर्झी प्यान, नट चॉकलेट, लीकर चॉकलेट असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. शेजारी पाजारी या फराळाचे वाटप केले जाते. गंमत म्हणजे नाताळचे भोजनही तितकेच चविष्ट आणि पारंपरिक असते. सामिष भोजनात इंदैल, सरपतेल, फुगे, पोळे, टेपरात, पुलाव असे पदार्थ असतात. सोबत मद्यही असते.
वसईच्या नाताळला मराठमोळा रंग आणखी एका कारणाने चढतो. तो म्हणजे नाताळ अंक. दिवाळी अंकाप्रमाणेच गेल्या दहा वर्षांपासून वसईत गीत नाताळ या नाताळ अंकाचेही प्रकाशन करण्यात येते. वसई भागात राहणाऱ्या नामवंत लेखकांच्या लेखांनी हा नाताळ अंक सजलेला असतो. येशूच्या जन्मदिवशी शहरात कार्निवलचं आयोजन करण्यात येते. नाताळच्या उत्साहात सर्वधर्मसमभावाचा अंतर्भाव असतो. ख्रिश्चन धर्मीयांसोबत इतर धर्मीयही उत्साहात नाताळ साजरा करतात.
(विशेष आभार- विजय परेरा, वसई)






























































