वसईतील शिलाहार संस्कृती

432

>> नमिता वारणकर

वसईला प्राचीन शिलाहार बांधकामाचे नमुने सापडतात. पण आज त्यांना पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे.

शिलाहार राजवटीतील साधारण 8 व्या कालखंडातील मंदिरांचे किचक, मंदिर द्वारपट्टी, श्रीगणेश, कीर्तिमुख असे काही अवशेष आज अत्यंत वाईट अवस्थेत वसई, तुंगार, विरार येथे विखुरलेल्या अवस्थेत सापडतात. पुराणकालीन अभ्यासाचे हे साधन जतन करण्याची आज आवश्यकता आहे.

शिलाहार राजवटीचा इतिहास आणि आजची स्थिती याविषयी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत सांगतात, ऐतिहासिक संदर्भाचा मागोवा घेताना दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौलपर्यंत पसरलेली होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिह्याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य 400 वर्षे होते. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱया वास्तू व अवशेष पालघर जिह्यातील विविध विखुरलेल्या असून अंतिम टप्प्यात आहेत.

अवशेषांचे काय झाले?
वाढती मानवी वस्ती आणि इतिहासाच्या अभ्यासाची अनास्था यामुळे अत्यंत महत्त्वाचे अवशेष कायमस्वरूपी भुईसपाट झालेले आहेत. काही स्वयंघोषित बाबा, बुवा, गुरुजी, साधू या मूर्ती राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व विभागाची कोणतीही पूर्व लेखी परवानगी न घेता लंपास करीत आहेत. या अवशेषांचे पुढे काय होते हे गुपितच आहे. विरार प्रांतातील बावखल पाडा विरार हायवे भागात शिलाहार कालखंडातील मंदिराच्या शिळा मातीत गाडल्या गेल्या आहेत. या अवशेषांना किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत भेटी देत आहेत. याविषयी त्यांचे म्हणणे आहे की, दर भेटीत अवशेष मूळ ठिकाण सोडून अधिकाधिक रस्त्याखाली किंवा मातीच्या ढिगाऱयाखाली नामशेष होत आहेत. तसेच काही जुन्या शिळा जवळपासच्या नव्या घरांच्या बांधकामात पायाशी पुरण्यात आलेल्या आहेत, अशी दुर्दैवी परिस्थिती दिसत आहे. वसईतील गास भागातील काही शिलाहार अवशेष कुठे आहेत, याबाबत कुणीच बोलत नाहीत. तर पारोळ मंदिरातील काही मूर्ती तर चक्क जेसीबी मशीन वापरून ढिगाऱयाखाली लोटण्यात आल्या. राज्य पुरातत्व विभागाची अपूर्ण मनुष्यबळ ही बोंब आणि केंद्रीय पुरातत्व विभागाची वेळखाऊ कार्यप्रणाली यात गेल्या किमान 100 वर्षांत जिह्यातील सर्वच अवशेष भुईसपाट झालेले आहेत.

ऐतिहासिक वस्तू संवर्धनाचा आदर्श
या ऐतिहासिक पाऊलखुणांचे नोंदणीकरण, संकलन, जतनीकरण, इतिहास लेखन, अवशेषांचे वर्णन अशी प्रदीर्घ कामे करण्यासाठी विशेष विभाग नेमावा. यावर गंभीरपणे ठोस उपाययोजना केल्यास येणाऱया पिढीलाही याची माहिती मिळेल. तसेच केवळ कायमस्वरूपी संग्रहालय निर्मिती करून मूळ मूर्ती एकत्रित एकाच ठिकाणी संवर्धन करण्यापेक्षा त्यांच्या मूळ स्थानावर त्यांचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी इच्छा ते व्यक्त करतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या