वसंत टेकडी जलकुंभातपाण्याची पातळी टिकेना, नगर शहरासह उपनगरांमध्ये पाणीपुरवठय़ात मोठी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर व उपनगर परिसराच्या पाणीपुरवठय़ात गेल्या काही महिन्यांपासून मोठी घट झाली आहे. ‘वसंत टेकडी’च्या टाकीत पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे राहत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, तीच यंत्रणा, तेच पंप, तेच कर्मचारी असताना पातळी घटली कशी? या प्रश्नावर पाणीपुरवठा विभागाला कोणतेही उत्तर देता आले नाही. मुळानगर, विळदवरून पाणीउपसा पूर्वीप्रमाणेच होत आहे. मग वसंत टेकडीत पाणी का येत नाही? पाणी नेमके मुरतेय कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सभापती अविनाश घुले यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. चार महिन्यांपूर्वी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. वसंत टेकडी येथील टाकीत सकाळी चार ते पाच फूट व दुपारी दोन फुटांपर्यंत पातळी राहत होती. सध्या केवळ सहा इंच एवढीच पातळी राहत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सभापती घुले यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक श्याम नळकांडे, उपायुक्त यशवंत डांगे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम आदींसह पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

वसंत टेकडी येथील टाकीत पाण्याची पातळी अपेक्षेनुसार राहत नसल्याने शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. पातळी का खालावली? याबाबत घुले यांनी जाब विचारला. मात्र, याबाबत कोणालाही उत्तर देता आले नाही. मागील वर्षी मार्च महिन्यात मुळा धरणातील पातळी आत्तापेक्षाही कमी होती. तरीही पाणीउपसा नियमित होऊन वसंत टेकडी येथे पाण्याची पातळी नियमित राहत होती. नोव्हेंबरपर्यंत ही पाणीपातळी चार ते पाच फुटांपर्यंत असल्याचे बैठकीत समोर आले. मुळानगर ते वसंत टेकडीपर्यंतच्या व्यवस्थेची पाहणी करणार असल्याचेही घुले यांनी सांगितले

पाणी वितरणव्यवस्थेचे खासगीकरण करा!

n बैठकीत शहराच्या पाणीपुरवठय़ात येत असलेले अडथळे, आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करून मार्ग काढावा, अशी सूचना सभापती घुले यांनी केली. आयुक्त गोरे यांनीही याबाबत सूचना केल्या. यात कर्मचाऱयांच्या कमतरतेबाबत चर्चा सुरू असतानाच अभियंता सदाशिव रोहोकले यांनी 25 टक्के कर्मचाऱयांवरच यंत्रणा काम करीत असून, पूर्ण क्षमतेने नियोजन शक्य नसल्याचे सांगत पाणीपुरवठा व वितरण योजनेचे खासगीकरण करण्याची सूचना त्यांनी मांडली. उद्या महापालिकेचेही खासगीकरण करा, असे म्हणाल. हा अधिकार मला नाही, असे म्हणत आयुक्तांनी यावर पडदा टाकला.

पाणी वितरणाचे फेरनियोजन करण्याची गरज

n वसंत टेकडी टाकीतून अनेक ठिकाणी थेट पाणी सोडले जाते. शहरात अनेक टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या अद्यापि भरल्या जात नसल्याने सध्याची पाणी वितरणाची पद्धत चुकीची आहे. त्याचे फेरनियोजन करण्याची गरज उपायुक्त डांगे यांनी व्यक्त केली. मात्र, त्यासाठी संपवेलजवळ यंत्रणा उभी करावी लागेल. शहर व उपनगरांत जसे शक्य होईल, त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जात असल्याचेही अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या यानुसार पाणीवाटपाचे नियोजन होत नसल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱयांअभावी दुरुस्तीची कामे रखडली

n शहरात अनेक ठिकाणी पाणीगळती होत असल्याकडे सभापती घुले यांनी लक्ष वेधले. दुरुस्तीची कामेही वेळेत होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे अडचणी येत असल्याचे अधिकाऱयांकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मनपाकडे योजना हस्तांतरित झाली त्यावेळी पाणी वितरणासाठी 190 कर्मचारी कार्यरत होते. आजमितीला केवळ 34 कर्मचाऱयांवर वितरणाचे कामकाज सुरू आहे. दुरुस्तीसाठी प्रत्येक झोनला एक फिटर, एक बिगारी उपलब्ध आहे. त्यात दुरुस्तीचे काम वेळेत होऊ शकत नसल्याचे वास्तवही अभियंत्यांनी मांडले. दुरुस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध करण्याबाबत निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अभियंता सातपुते यांनी सांगितले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तातडीने सध्याच्या ठेकेदाराकडून मजूर उपलब्ध करून घ्यावेत. त्याच्या खर्चाला मंजुरी दिली जाईल. सद्यःस्थितीत शहराला पाणी देणे महत्त्वचे असून, त्यासाठी जे करायचे असेल, ते करावे, असा आदेश आयुक्त गोरे यांनी दिला.