
मुंबई गोवा चौपदरीकरणाच्या ढिसाळ कामाचा फटका आज पुन्हा एकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला. चिपळूण येथील वासिष्ठी पुल चौपदरीकरणाच्या कामासाठी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोव्याकडे जाणारी वाहतूक फरशी तिठा येथून गुहागर बाय-पास रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र याबाबत कोणतेही योग्य नियोजन नसल्याने हा मार्गही बंद झाला.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह कोकणी जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांची कामाबाबत मनमानी सुरू आहे. मनमानीबाबत कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर कायद्याचा धाक दाखवून तो चिरडला जात असल्याने ठेकेदार कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
ठेकदाराच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवारी सकाळी भोस्ते घाटात दरड कोसळूनवाहतुक ठप्प झाल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. ही घटना ताजी असताना आज महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या नियोजनशून्य कामामुळे पुन्हा महामार्ग प्रवाशांना तब्बल पाच ते सहा तास महामार्गावर खोळंबून रहावे लागले.
महामार्गावरील वाशिष्ठी पुलाच्या कामासाठी हा पूल रात्री 11 ते पहाट 4 या दरम्यान बंद ठेवण्यात आला होता. मात्र पुलाचे काम वेळेत न पूर्ण झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली. पहाटे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी रहदारीचे नियोजन करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नव्हती. कोकणात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे वारंवार महामार्गावरील वाहतुक ठप्प होवू लागला असल्याने कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची फार मोठी गैरसोय होवू लागली आहे.
























































