
सामना प्रतिनिधी। हट्टा/वसमत
वसमत तालुक्यातील नहाद येथे एका चुलतीने पुतण्याबरोबर लग्न केल्याने सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. या दोघांवरही कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी हट्टा येथे हिंगोली-परभणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच हट्टा येथील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली.
वसमत तालुक्यातील नहाद येथील एका 37 वर्षीय महिलेने दिराच्या मुलाशी म्हणजेच 19 वर्षीय पुतण्याबरोबर हट्टा येथील मंदिरामध्ये विवाह केला होता. या विवाहाची चर्चा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियावर रंगली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. मंदिरात त्यांनी अश्लिल चाळेही केले असे बोलले जात होते. यामुळे सर्व भाविकांच्या भावना दुखावल्या. सर्व नागरिकांनी14 मे रोजी हट्टा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. परंतु, यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्यामुळे त्या प्रेमीयुगलांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी रमेश दिमेवार, बाळासाहेब देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष डॉक्टर एस. एम. देशमुख, मुंजाजी देशमुख आदींनी 18 मे रोजी सदरील निवेदन दिले होते. पण यावर कुठलीच कारवाई न झाल्याने 20 मे रोजी हट्टा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून हट्टा बसस्थानक येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तसेच यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देशमुख यांनी लवकरच यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा रस्ता रोको मागे घेण्यात आला. तसेच यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. एकंदरीत चुलती-पुतण्याचा विवाह कोणी लावला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी भक्तगणांनी केली आहे. यामुळे कोणा-कोणावर कारवाई होणार हे आता पहावे लागणार आहे.


































































