२८ जूनला कोरठण खंडोबाचा वटपौर्णिमा उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वटपौर्णिमा उत्सव दि. २८ जून ला आयोजन करण्यात आले आहे. वटपौर्णिमा मुले महिला भक्ताची गर्दी होणार असून मंदिराजवळ वटवृक्षाची पारंपरिक पूजा अर्चना करून महिला देवाचे दर्शन घेतील.

पौर्णिमेला सकाळी ६ वाजता श्री खंडोबा मंगलस्नान, अभिषेक पुजा होईल, सकाळी ८ वाजता महाआरती होईल. सकाळी ९ वाजता देवाची पालखीतून कोरठण गडाला प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत सदा आनंदाचा येळकोटचा जयघोष करत भंडारा – खोबरे उधळत प्रदक्षिणा करतील. या वेळी हजारो भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन होईल, लंगर तोडल्यावर पालखीला नैवैद्य हे धार्मिक विधी होऊन पालखी मंदिरात परत आगमन होईल. तळीभंडार, कुलधर्म – कुलाचार साठी भाविकांची या पर्वणीला गर्दी होते, गोंधळ व जागरण विधी सभामंडपात दिवसभर चालतात.

सकाळी १० वाजल्यापासून कै. देवराम बाळा घुले स्मरणार्थ पोपट घुले यांच्याकडून तसेच अशोक शिंदे (डोबिवली) व धोंडिभाऊ राधवण (टाकळी ढोकेश्वर) यांच्या तर्फे पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप होईल. देवस्थानतर्फे दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंग, पिण्याचे पाणी नियोजन आहे. सुट्ट्यांचा हंगाम आणि लग्नसराईमुळे भाविक भक्तांच्या संख्येत रोज वाढ होत आहे . सध्या पाणी टंचाई झाल्यामुळे देवस्थानला भाविकांसाठी खासगी टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहे.

मंदिर परिसरात पाऊस झाल्याने निसर्गरम्य वातावरण असून रोज गर्दी वाढत आहे देवस्थानच्या पालखी साठी सागवानी लाकडातील कलाकृतीतील शाही रथ बनविण्याचे काम चालू असून सभामंडपाच्या पहिला मजला हॉल बांधकाम सुरु आहे. ज्या भाविक – भक्त व देणगीदार यांना यथाशक्ती देणगी द्यायची असेल त्यांनी देवस्थान ट्रस्ट पावतीवर किंवा यूको बँक बचत खाते नं. ०९६२०१००००५६३७ या खात्यावर जमा करावे असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

सर्व भाविक भक्तांनी पर्वणीतील कुलदैवताचे देवदर्शन, पालखी सोहळा, महाप्रसाद पंगत याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेन्द्र नरड, चिटणीस सौ. मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर सर्व आजी – माजी विश्‍वस्त ग्रामस्थ, भक्तगण यांनी केले आहे.