वायुकुमार मंडळाची ‘सुवर्ण महोत्सवी’ स्थानिक राज्यस्तरीय कबड्डी उद्यापासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वायुकुमार विकास मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने शुक्रवारपासून 19 ते 21 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वायुकुमार मंडळाने शरदचंद्र पवार बंदिस्त क्रीडा संकुल, वडगाव-सहाणी, जुन्नर-पुणे येथील मॅटच्या एका क्रीडांगणावर हे सामने आयोजित केले आहेत.

सामने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रांत प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत इच्छाशक्ती मंडळ(पालघर), चेतक स्पोर्टस् क्लब, राकेशभाऊ घुले (दोन्ही पुणे), बाबुराव चांदेरे स्पोर्टस् फाऊंडेशन (नांदेड), छावा क्रीडा मंडळ, शाहू सडोली (दोन्ही कोल्हापूर), मिडलाईन स्पोर्टस् टीबीएम (दोन्ही रायगड), अंकुर स्पोर्टस्, गोल्फादेवी मंडळ (दोन्ही मुंबई शहर), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर, जय बजरंग मंडळ (वासिंद-ठाणे), एन.टी.पी.एस. (नंदुरबार) आणि जय मातृभूमी मंडळ (सांगली) आदी मातब्बर संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अंतिम विजयी संघास रोख रु. पंच्याहत्तर हजार पाचशे पंचावन्न (75,555/-) व आकर्षक सुवर्ण महोत्सवी चषक तर उपविजेत्या संघास रोख रु.पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न (55,555/-) व चषक प्रदान करण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु. पस्तीस हजार पाचशे पंचावन्न (35,555/-) व चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस रोख रु. सात हजार सातशे सत्त्याहत्तर (7,777/-) व चषक, तर उत्कृष्ट पकड, चढाई व उदयोन्मुख खेळाडू यांना प्रत्येकी रोख रु. पाच हजार पाचशे पंचावन्न (5,555/-) व चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यात कोणतीही कसूर राहू नये म्हणून सर्व कार्यकर्ते जोमाने मेहनत घेत आहेत अशी माहिती एका पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष संतोष गुळवे, सरचिटणीस अनिल पांडे यांनी प्रसार माध्यमांना दिली. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार अतुल बेनके यांच्या बरोबरीने मंडळाचे उपाध्यक्ष शांताराम वाबळे, सुमित वाबळे व संस्थेचे इतर पदाधिकारी सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.