पोलीस संरक्षणात आमखासची भाजी मंडई सूरू; नागरिकांना शिस्त लावणार

513

संभाजीनगरच्या आमखास मैदानावर सुरु करण्यात आलेल्या भाजी मंडईला शिस्त लावण्यासाठी रविवारी पोलीसांची मदत घेण्यात आली. सामाजिक अंतराचा नियम पाळण्याची सक्ती यावेळी करण्यात आली. ग्राहकांनाही तसे आवाहन करण्यात आले. भाजी खरेदी विक्रीसाठी जाधववाडी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाची भीती व्यक्त होत होती.

या परिस्थितीचा विचार करता महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येत शहरात विविध चाळीस ठिकाणी भाजी मंडई सुरु करण्याचा निर्णय घेतला व भाजी मंडई सुरु करण्यात आली. त्यातीलच एक भाजी मंडई आमखास मैदानावर सुरु करण्यात आली. परंतु या ठिकाणच्या भाजी मंडईत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नसल्याचे शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले. त्यांनी भाजी विक्रेते व ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवून भाजीची खरेदी-विक्री करा असे आवाहन केले होते. पण त्याकडे संबंधितांनी विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी महापौरांनी पुन्हा या ठिकाणी भेट दिली आणि भाजी मंडईची पाहणी केली. शनिवारसारखीच परिस्थिती पुन्हा या ठिकाणी दिसून आल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त मीना मकवाना यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांची कुमक देण्याची विनंती महापालिकेकडून करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी भाजी विक्रेते व ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवून व्यवहार करण्यास भाग पाडले.

आपली प्रतिक्रिया द्या