हिरवी मिरची, घेवडा, भुईमूग शेंग स्वस्त

पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटो, वांगी, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, हिरवी मिरची, घेवडा, भुईमूग शेंग यांच्या भावात दहा ते वीस टक्के घट झाली आहे. तर इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि. 8) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये बंगळुरू येथून टोमॅटो 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 15 ते 20 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, इंदूर येथून गाजर 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश 3 ते 4 टेम्पो मटार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 550 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 5 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 4 ते 5 टेम्पो, भुईमूग शेंग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 50 ते 60 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक तेजीत
पावसामुळे पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे भाव तेजीत होते. गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 8) कोथिंबिरीची सुमारे 75 हजार जुडी तर मेथीची 20 हजार जुडींची आवक झाली होती.