कामगारांच्या सुटकेसाठी पुन्हा डोंगरमाथा खोदणार, सुटकेची वाट पाहणाऱ्या कामगारांना आणखी 4 दिवस बंदिवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिल्क्यारा बोगद्यात गेले दोन आठवडे सुटकेच्या क्षणाची चातकासारखी वाट पाहाणाऱ्या 41 कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता डोंगराच्या माथ्यावरून उभे खोदकाम सुरू झाले आहे. आतापर्यंत 19.2 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले आहे. कोणताही अडथळा न आल्यास आम्ही चार ते पाच दिवसांत कामगारांपर्यंत पोहोचू, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पाईप सरकवण्यासाठी आडवे खोदकाम करणाया ऑगर मशिनची पाती तुटल्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर खोदकाम थांबवण्यात आले होते. आता सुटकेचा दुसरा मार्ग म्हणून टेकडीच्या माथ्यावरून उभे खोदकाम सुरू झाले आहे. हे काम सतलज विद्युत निगम लिमिटेड द्वारे केले जात आहे.

गुरुवारपर्यंत खोदकाम पूर्ण होण्याची शक्यता

बचाव पथकांना या मार्गाने कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर उभे खोदकाम करावे लागणार आहे. हे खोदकाम व्यवस्थित सुरू असून, कुठलाही अडथळा न येता खोदकाम असेच सुरळीत सुरू राहिले येत्या गुरुवारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे, असे राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी रविवारी संध्याकाळी सांगितले.