
अन्यायाविरुद्ध पहाडाप्रमाणे उभा ठाकणारा ही मॅन आणि नायिकेकडे स्वप्नाळू नजरेनं पाहणारा हँडसम नायक ही दोन्ही रूपं सारख्याच ताकदीने साकारणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. रुपेरी पडदा पोरका झाला. ग्रीक देवांसारखा चेहरा आणि योद्धय़ाला शोभेल अशी बळकट शारीरिक ठेवण लाभलेल्या धर्मेंद्र देओल नावाच्या ‘हिरो’ने हिंदी रुपेरी पडद्यावरच्या नायकाची केवळ प्रतिमाच बदलली नाही तर आपला मुलगा, भाऊ आणि नवरा असाच असावा ही अपेक्षा आणि हे स्वप्नही हिंदुस्थानातील घराघरात आणि मनामनात पेरले. ‘कुत्ते कमीने… मै आ रहा हूं’ अशी गर्जना करीत धर्मेंद्र आग ओकणारा संताप व्यक्त करीत तेव्हा दुष्ट-नालायक खलनायकाचा निःपात अटळ आहे ही जाणीव आणि विश्वास आलम दुनियेला देणारा लाडका सुपरहिरो गेल्याचं ठसठसणारं दुःख मागे ठेवून पुरुषी – मर्दानी सौंदर्याचं देणं लाभलेला हा महानायक अप्सरांच्या प्रदेशात निघून गेला. धरम-युगाचा अस्त झाला!
वाघ आणि शेट्टी
धर्मेंद्र यांनी चार पिढय़ांच्या सिने रसिकांवर जादू केली. त्यांच्या हाणामारीच्या प्रसंगांची लोक वाट पाहात. विशेषतŠ वाघासोबत त्यांची झटापट टाळ्या वसूल करीत असे. शिवाय फाईट मास्टर शेट्टी हे असे दणकट खलनायक होते की त्यांना केवळ धर्मेंद्र मारू शकतील असा विश्वास लोकांना वाटे. बाकी नायकांच्या ‘ढिश्श्य़ूम’ वर शेट्टी खाली पडत तेव्हा ही लढाई लुटुपुटुची वाटे. पण धर्मेंद्र आणि शेट्टी एकमेकांसमोर उभे ठाकले की चित्रपटगृह श्वास रोखून हा मारामारीचा प्रसंग पाहत असे. धर्मेंद्र यांचे गारुड असे होते.
त्यांचा नायक ‘आपला’ वाटायचा! उद्धव ठाकरे यांच्याकडून आदरांजली
‘धर्मेंद्र यांचा पडद्यावरचा नायक आपला वाटायचा’, अशा भावना व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. ‘साठ वर्षांपेक्षा जास्त हिंदी सिनेमाच्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेले अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न आहे. धर्मेंद्र यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यांचा पडद्यावरचा नायक हा आपला वाटत होता. शोले, फुल और पत्थर, सीता और गीता अशा असंख्य चित्रपटांनी धर्मेंद्र रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले,’ असे उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुखांशी खास दोस्ताना
धर्मेंद्र हे दिलखुलास व्यक्तिमत्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा खास दोस्ताना होता. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती लाभली, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांचा परिवार मोठा आहे. त्यांच्या दुःखात ठाकरे परिवार आणि शिवसेना सहभागी आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
आजा तेरी याद आयी…
अखेरचा निरोप… धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हेमा मालिनी स्मशानभूमीत पोचल्या. त्यांनी मीडियासमोर हात जोडून आपले दु:ख व्यक्त केले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. गाडीत त्यांच्यासोबत मुलगी ईशा होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही रिल आणि रिअल लाईफची लोकप्रिय जोडी होती.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उत्तरोत्तर प्रकृती खालावत गेली आणि आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रकाश कौर, हेमा मालिनी, मुले सनी आणि बॉबी, मुली अजिता, विजेता, ईशा, अहाना असे कुटुंब आहे.
विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सनी देओल याने वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांसह अनेक नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती. लाडक्या धरमपाजींना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे बॉलिवूड लोटले होते. महानायक अमिताभ बच्चन, पटकथा लेखक सलीम खान, अभिनेत्री सायरा बानू, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
सिनेमांचे त्रिशतक! एका वर्षात नऊ हिट
धर्मेंद्र यांनी 300हून अधिक चित्रपटांत काम केले. एका वर्षात नऊ हिट सिनेमे देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘हकीकत’, ‘अनुपमा’, ‘फुल और पत्थर’, ‘ऑंखे’, ‘शिकार’, ‘आया सावन झुमके’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘सीता और गीता’, ‘राजा जानी’, ‘जुगनू, ‘यादों की बारात’, ‘प्रतिज्ञा’, ‘धरम वीर’, ‘आग ही आग’, ‘ऐलान ए जंग’, ‘चुपके चुपके’, ‘गुड्डी’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘गुलामी’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.
जय-वीरू
सत्तरच्या दशकात आलेला ‘शोले’ हा चित्रपट इतर अनेक कलाकारांप्रमाणे धर्मेंद्र यांच्यासाठीही टार्ंनग पॉइंट ठरला. ‘शोले’तील मित्रासाठी काही करण्याची तयारी असलेली त्यांची ‘वीरू’ची भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमातील ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…’ हा डायलॉग अजरामर ठरला. त्यामुळे धर्मेंद्र यांना वेगळी ओळख मिळाली. ‘जय-वीरू’ या जोडीची जादू आज पन्नास वर्षांनंतरही कायम आहे. हे त्यांच्या अभिनयाचे यश मानले जाते.
चरित्र भूमिकांमध्ये उमटवला ठसा
नव्वदीच्या दशकानंतर ते चरित्र भूमिकांमध्ये रमले. ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘अपने’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘जॉनी गद्दार’, ‘यमला पगला दिवाना’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले. 2024 साली ‘तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात धर्मेंद्र शेवटचे दिसले. त्यांचा आगामी ‘इक्कीस’ हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘चुपके चुपके’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता – शर्मिला टागोर
धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक सिनेमे करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी धरमपाजींच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. धर्मेंद्र यांची प्रतिमा माचो मॅनसारखी असली तरी त्यांचे विनोदाचे टायमिंग अफलातून होते. ‘चुपके चुपके’साठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, पण तसे झाले नाही, अशी खंत शर्मिला टागोर यांनी बोलून दाखवली.
खरे जेंटलमन – आशा पारेख
धर्मेंद्र या जगात नाहीत, हे कळल्यानंतर मी खूप दुःखी झाले. ते खरे जेंटलमन होते. मस्क्युलर मॅचो मॅन अशी प्रतिमा असली तरीही त्यांचा चेहरा अतिशय निरागस होता. आजचा दिवस खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रया अभिनेत्री आशा पारेख यांनी दिली.
हृषिकेश मुखर्जीं आणि धर्मेंद्र
अॅक्शन हिरो अशी धर्मेंद्र यांची ओळख असली तरी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून हृषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांना वेगळय़ा पठडीच्या भूमिका दिल्या. हृषिकेश मुखर्जी यांनी सत्यकाम, अनुपमा, गुड्डी, चुपके चुपके या चित्रपटांत धर्मेंद्र यांना संधी दिली. एकदा बंगळुरूवरून परतताना विमानात हृषिकेशदा यांनी ‘आनंद’ चित्रपटाची गोष्ट धर्मेंद्र यांना सांगितली. ऐनवेळी त्यांनी राजेश खन्ना यांना घेतले. त्यांच्या या निर्णयाचा धर्मेंद्र यांना राग आला. धर्मेंद्र यांनी रात्रभर मुखर्जी यांना फोन करत “तू मला ही भूमिका देणार होतास, मग तू त्याला ती भूमिका का दिलीस?’’ असा जाब विचारला. त्यावर “धरम तू झोप, आपण सकाळी बोलू.’’ असे म्हणत हृषिकेशदा वारंवार फोन कट करायचे.
योगदान अद्वितीय – राहुल गांधी
महान अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. धर्मेंद्र यांचे सिने क्षेत्रातील सात दशकांचे अद्वितीय योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.
आदित्य ठाकरे यांनी वाहिली आदरांजली
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी धर्मेंद्र यांचा शिवसेनाप्रमुखांसोबतचा पह्टो शेअर करून त्यांना आदरांजली वाहिली. ‘धर्मेंद्र ह्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. गेली सहा दशके त्यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. देओल कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांप्रती सहवेदना,’ असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
गुंतागुंतीच्या जगातला सरळ माणूस – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. ‘सुपरस्टार’ म्हटलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि ओसरण्याचाही एक काळ असतो. धर्मेंद्र यास अपवाद होते. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांनी कधी स्वतःला चिकटू दिलं नाही. कारण त्यांचं आयुष्य प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हीरो वाटत राहिला, असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ते कलाकारांच्या तरुण पिढय़ांना कायम प्रेरणा देत राहतील. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या मनाला भिडल्या. त्यांचा साधेपणा, नम्रता तितकाच प्रशंसनीय होता. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. ओम शांती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळला. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलदंड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून लौकिक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
चैतन्याचा ज्वालामुखी शांत झाला! – जावेद अख्तर
‘एक युग संपले’, हे शब्द धरमजींच्या बाबतीत अगदी खरे आहेत. धरमजींचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांच्यासारखा दुसरा कुणी नाही आणि होणारही नाही. चैतन्याचा ज्वालामुखी आज शांत झाला. संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. दुर्दैवाने मी आज मुंबईत नाही.
माणूस गेल्यावर त्याचे काम आणि त्याच्या आठवणी मागे राहतात. धर्मेंद्र यांच्या अशा अनेक आठवणी माझ्याजवळ आहेत. ‘शोले’तील विरूची भूमिका फक्त तेच करू शकत होते. दुसरा कुणीही विरू करू शकत नव्हता. आमच्या डायलॉगमध्ये त्यांनी जान आणली… ऊर्जा भरली. त्यांच्या अभिनयाने विरूची भूमिका जिवंत केली. ‘शोले’मधील धरमजींचा कोणताही सीन बघा, तुम्हाला याची प्रचीती येईल. कुठलाही अॅक्शन सिनेमा असो किंवा ‘अनुपमा’सारख्या चित्रपटातील जंटलमॅन असो धर्मेंद्रजींच्या अभिनयात कमालीची वैविध्यता होती.
धरमजींचा स्वतःचा असा एक आब होता. ते स्वाभिमानी होते. त्यांच्याशी कुणीही कसेही वागू शकत नव्हते. पण त्याचवेळी ते प्रेमळ होते, मनमिळावू होते. अशा दोन्ही खुबी असणारी माणसं भेटणं दुर्मीळ असते. एकीकडे ते ही- मॅन होते, तर दुसरीकडे हळुवार, विनम्र आणि शांत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अशा भिन्न छटा होत्या. ते खूप चांगले होते. त्यांची देशी विनोदबुद्धी कमाल होती.
माझी त्यांची पहिली भेट झाली ती ‘यकीन’च्या चित्रपटाच्या वेळी. मी 20-21 वर्षांचा होतो.‘यकीन’मध्ये धरमजी मुख्य भूमिकेत होते आणि मी क्लॅपर बॉय होतो. माझा पगार महिना 175 रुपये. ते टॉपचे नट होते. तरीही ते चांगले वागले याला कारण म्हणजे त्यांचा सभ्यपणा. त्यानंतर कधीतरी एकदा ते माझ्यावर चिडले, पण नंतर त्यांनी मला सॉरी म्हटले. निश्चितच ते इतरांपेक्षा वेगळे होते.





























































