
सामना ऑनलाईन । मुंबई
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिनेजगतासाठी एक दुःखद बातमी आहे. आपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. कॅनडा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. कादर खान यांचे पुत्र सरफराज यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
खान हे प्रदीर्घ काळापासून श्वसनाच्या समस्येने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला होता. अखेर 31 डिसेंबर रोजी कॅनडा येथे सायंकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक उत्तम अभिनेताच नव्हे तर एक लेखक आणि एक उत्तम माणूस गमावल्याची भावना सिनेवर्तुळातून व्यक्त होत आहे.
कादर खान यांनी आजवर जवळपास 300हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. कोणतेही अंगविक्षेप न करता, फक्त संवादफेक आणि देहबोलीतून विनोदनिर्मिती करण्यात कादर खान यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांच्या विनोदावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.


























































