प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन

1950-60 च्या दशकात चंदेरी दुनियेतल्या प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सरला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे बुधवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 88 वर्षांच्या होत्या. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 1949 साली चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या निम्मी यांनी 16 वर्ष मोठा पडदा त्यांच्या अभिनयाने गाजवला. राज कपूर यांनी निम्मी यांना चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक दिला. राज कपूर यांनी त्यांचे नाव देखील बदलले. त्यांचे खरे नाव नवाब बानो होते. राज कपूर यांनी त्यांचे नाव निम्मी ठेवल्याचे समजते. त्यांनी बरसात या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर उडन खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे मेहबूब अशा हिट चित्रपटात काम केले. त्या त्यांच्या पदार्पणानंतर खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. राज कपूर, अशोक कुमार, दिलीप कुमार, धर्मेंद्र असे दिग्गज अभिनेते त्यांच्यासोबत काम करायला उत्सुक असायचे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट, ज्येष्ठ अभिनेते रिषी कपूर यांनी ट्विटरवरून निम्मी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या