
सामना प्रतिनिधी, मुंबई
कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक दीनानाथ लाड यांचे नुकतेच निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. दीनानाथ लाड हे महापालिका शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना लहानपणापासूनच नाटय़क्षेत्राची खूप आवड होती.
कामगार रंगभूमीवर व राज्य नाटय़ स्पर्धेसाठी त्यांनी विजय तेंडुलकर यांचे ‘श्रीमंत’ हे नाटक दिग्दर्शन करून प्रमुख भूमिका केली. या नाटकाने अभिनयाचे दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवले. ‘वैजयंती’, ‘काचेचे घर’, ‘खून पहावा करून’, ‘वेडी माणसं’ अशी नाटके दिग्दर्शित करून भरपूर पारितोषिके मिळविली. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सौभाग्य’, ‘काचेचा चंद्र’, ‘तव प्रीतीची’ अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. ‘एकच प्याला’ या राम गणेश गडकरींच्या नाटकाची दोन अंकी रंगावृत्ती त्यांनी तयार करून त्यात भूमिकासुद्धा केली होती.



























































