ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही. एन. मयेकर यांचे निधन

घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व, लिजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे संकलन करणारे ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही. एन. मयेकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. दरम्यान, रात्री उशिरा दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चित्रपट संकलक व्ही. एन. मयेकर यांनी 45 वर्षांच्या कारकीर्दीत बासू चटर्जी, राजपुमार संतोषी, महेश मांजरेकर अशा अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बासू चटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात.’ हा चित्रपट प्रचंड गाजला. पुढे त्यांनी दामिनी, अस्तित्व, पुकार, पिता, खाकी, विवाह, पुरुक्षेत्र, पुकार, दिल्लगी अशा शंभरहून अधिक बॉलीवूड चित्रपटांचे संकलन केले. पसंत आहे मुलगी, जन्मदाता, मी तुझी तुझीच रे या मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. संकलनाचे काम संगणकावर सुरू झाल्यानंतर भल्या भल्या ज्येष्ठ संकलकांनी काम करणे सोडून दिले होते. मयेकर यांनी काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल आत्मसात केले. त्यांच्या कारकीर्दीची दखल घेत राज्य सरकारच्यावतीने त्यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.