
मराठी साहित्य विश्वातील एक ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. नंदा खरे यांच्या निधनामुळे मराठी सारस्वत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नंदा खरे यांचं खरं नाव अनंत खरे असं होतं. साहित्यिक जगात ते नंदा खरे या नावाने प्रसिद्ध होते. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या साहित्याचे एक ठळक वैशिष्ट्य. त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या आहेत, त्यापैकी ‘अंताजींची बखर’ ही एक आहे.
‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. अलिकडेच त्यांची ‘नांगलल्यावीन भुई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती.






























































