नागपूरात विको कंपनीला भीषण आग, मोठया प्रमाणात नुकसान

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरात विको कंपनीला मोठी आग लागली या आगीत दोन मजली इमारत उध्वस्त झाली, ही आग इतकी भीषण होती की, तिला आटोक्यात आणायला तब्बल नऊ तास लागले.

अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि अनेक वॉटर टँकर्सने मध्यरात्रीपासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. आता आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली असून कुलिंगचे काम सुरू आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला आग एका भागापुरता मर्यादित होती. मात्र पाहता पाहता आग कारखाना परिसरात सर्वत्र पसरली. आग एवढी प्रचंड होती की, त्यामुळे कारखाना परिसरातील मागील बाजूची इमारत कोसळली आहे. इमारतीच्या काँक्रिटचा स्लॅब आणि लोखंडी स्ट्रक्चर खाली कोसळला आहे. तर समोरच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारत आणि पॅकेजिंगच्या इमारतीला ही आगीची झळ बसली आहे.

कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर औषध आणि कॉस्मेटिक्ससाठीचा कच्चा माल असल्याने त्यामध्येही अल्कोहोल आणि मेण मोठ्या प्रमाणावर असल्याने आग जास्त पसरली असल्याची शक्यता आहे. या आगीत विकोच्या प्रयोगशाळेत मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या इमारतीचेही नुकसान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या