चंद्रपुरात आज विदर्भस्तरीय ओबीसी महिला अधिवेशन, ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता निर्मितीवर मंथन

obc meeting

ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन आज चंद्रपुरात होणार आहे. हे अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर होत असून अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात महिलांशी निगडित विविध विषयांवर चर्चा करुन ठराव पारित करण्यात येणार आहेत. ओबीसी समाजाकरीता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे. हुंडाबळी ठरलेल्या स्व. वैष्णवी हगवणे व आजवर हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.

हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचाराच्या न्यायालयीन केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील अनिष्ठ परंपरा व महिलांवरील अन्यायकारक रूढींना पायबंद घालण्याबाबत चर्चा करुन ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी अधिवेशनात मंथन होईल. विदर्भ स्तरीय ओबीसी महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक अनोखा सामाजिक प्रयोग करण्यात येत आहे.