
ताजमहालमध्ये कथितपणे नमाज पठण केल्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला असून, त्यानंतर खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुरातत्व विभाग चौकशी करत आहे. अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजकुमार पटेल यांनी सांगितले की, सध्या ताजमहालमध्ये पर्यटकांची जास्त गर्दी आहे, अशा परिस्थितीत हा प्रसंग कधी घडला हे आपल्या लक्षात आलेला नाही, तरीही या व्हिडीओची चौकशी केली जात आहे. हा व्हिडीओ रविवारचा असल्याचे बोलले जात आहे.
ताजमहालच्या आत कोणत्याही प्रकारची धार्मिक कृती करण्यास मनाई आहे. शुक्रवारी, ताजमहालच्या आत असलेल्या शाही मशिदीत फक्त स्थानिक लोकच नमाज पठाण करू शकतात. याशिवाय रमजान महिन्यात आणि ईद आणि बकरीदच्या दिवशी सकाळची नमाज पठण करता येते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बागेत नमाज अदा करत आहे. हा व्हिडीओ एका पर्यटकाने बनवला असून त्याने तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये टोपी घातलेला एक पुरुष नमाज पठण करताना दिसत आहे आणि त्याच्या शेजारी एक महिला बसलेली आहे.
पुरातत्व विभाग आणि सीआयएसएफमध्ये घबराट पसरली आहे. ताजमहालमधील अशा कारवाया रोखण्याची जबाबदारी ASI कर्मचारी आणि CISF च्या जवानांची आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभा ब्रज प्रांत महिला सेलच्या अध्यक्षा मीना दिवाकर यांनी या प्रकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन करून अधिक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांना निवेदन दिले. अशा उपक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.





























































