हनिमूनवर प्रश्न विचारल्याने पाकिस्तानी गायिका संतापली, भर कार्यक्रमात विनोदी कलाकाराच्या कानशिलात लगावली

कॉमेडी शोमध्ये पाहुण्या कलाकारांची थट्टा मस्करी करणे काही नवीन नाही. मात्र एका कॉमेडीयनला लाईव्ह शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून आलेल्या गायिकेला हनिमूनबाबत प्रश्न विचारणे चांगलेच महागात पडले आहे. हनिमूनबाबत प्रश्न विचारल्यावर संतापलेल्या गायिकेने चक्क त्या कॉमेडीयनच्या भर कार्यक्रमात कानशिलात लगावली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानी गायिका शाजिया मंझूर हिने कार्यक्रमाचा होस्ट आणि कॉमेडीअन शेरी नन्हा याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कार्यक्रमाचा दुसरा होस्ट आणि कॉमेडीअन अब्बास हैदर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये को-होस्ट शेरीने त्यांना हनीमूनबाबत प्रश्न विचारला होता आणि यानंतर शाझिया यांनी म्हटले की, ‘ठीक आहे, एक गोष्ट आहे की तू थर्ड क्लास व्यक्ती आहेस. मी मागच्या वेळीही बोलले होते. सर्वांना ते प्रँक असल्याचे वाटत होते. तू आता हनिमूनबद्दल बोलतोय, तुला लाज वाटत नाही का? कुणाला बोलावू का? प्रश्नांच्या अशा फैरी झाडत शाजिया यांनी कानशिलात लगावली. त्यानंतर अब्बास हैदर यांने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळी अब्बास हैदरही रागावून स्क्रिप्ट सोडून प्रश्न का विचारतोस असे विचारताना दिसत आहे. त्यानंतर साजिया संतापाने तिथून निघून जाताना दिसत आहेत.