दिवाळीआधीच फुटणार विजयाचे फटाके!

737

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल शनिवारी अखेर वाजले. 21 ऑक्टोबर रोजी या दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. 25 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होईल. म्हणजेच यंदा डबल धमाका असून दिवाळीआधीच विजयाचे फटाके फुटणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. 9 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असून एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण 95,473 मतदारसंघ असून 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेची मुदत 2 नोव्हेंबरला संपत असून तेथे 1 कोटी 82 लाख 98 हजार 714 मतदार आहेत. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाल्याचेही आयुक्त अरोरा यांनी जाहीर केले. या वेळी निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा हेसुद्धा उपस्थित होते.

rang-2

निवडणूक कार्यक्रम
27    सप्टेंबर निवडणुकीची अधिसूचना
4     ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल
5     ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची छाननी
7     ऑक्टोबर अर्ज मागे घेणे
21    ऑक्टोबर मतदान
24    ऑक्टोबर मतमोजणी

प्लॅस्टिकचा वापर टाळा
विधानसभा निवडणुकीसाठी प्लॅस्टिकचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात टाळावा, असे आवाहनही निवडणूक आयोगाने केले आहे. यासंदर्भात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱया कर्मचाऱयांसह उमेदवारांनाही आम्ही आवाहन करत आहोत, असे सुनील अरोरा यावेळी म्हणाले.

उमेदवाराच्या खर्चावर लक्ष
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. या मर्यादेतच खर्च होत आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी तसेच निवडणूक प्रकियेतील पैशांच्या होणाऱया गैरवापराला पायबंद घालण्यासाठी निवडणुकीदरम्यान पर्यवेक्षक अधिकारी पाठविले जातील.

गडचिरोली व गोंदियासाठी विशेष सुरक्षा

महाराष्ट्रातील नक्षलप्रभावित जिल्हे म्हणून ओळखल्या जाणाऱया गडचिरोली व गोंदिया या दोन जिह्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. या दोन्ही जिह्यांत मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

या राज्यांत पोटनिवडणुका
निवडणूक आयोगाने काही राज्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला. ती राज्ये… अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पॉण्डिचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामीळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश.

 

आपली प्रतिक्रिया द्या