
टीम इंडियाचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुडगूस घालणार असल्याची शक्यता आहे. विजय हजारे करंडकात रोहित शर्मा मुंबईकडून मैदानात उतरू शकतो. तसेच पहिल्या दोन सामन्यांच्या खेळाडू निवड प्रक्रियेसाठी तो उपलब्ध असल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहित शर्माच्या निवडीमुळे तरुण खेळाडूंना रोहित शर्मासोबत खेळताना आपल्या खेळात सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तरुण खेळाडू उत्सुक आहेत.
विजय हजारे करंडकात रोहित शर्मा सुरुवातीला खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपस्थित असल्याचं वृत्त आहे. मुंबईचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी सिक्कीमविरुद्ध आणि 26 डिसेंबर रोजी उत्तराखंडविरुद्ध होणार आहे. या दोन सामन्यांसाठी रोहित शर्माची मुंबईच्या संघात निवड होऊ शकते. रोहित शर्माची मुंबईच्या संघात निवड झाल्यास मुंबईच्या संघाला स्पर्धेची सुरुवात दणक्यात करण्याची संधी आहे. यामुळे चाहत्यांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचली आहे.
विजय हजारे करंडकाड मुंबईकडून रोहित शर्मा व्यतिरिक्त टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी करंडाक मुंबईचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे त्याला अर्ध्यात स्पर्धा सोडावी लागली होती. विजय हजारे करंडकात मुंबईचा समावेश ग्रुप सी मध्ये असून या ग्रुपमध्ये मुंबई व्यतिरिक्त पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा या संघांचा समावेश आहे.


























































