
विजय हजारे करंडकात ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान या दोन्ही खेळाडूंनी विस्फोटक फलंदाजी करत आदल्या दिवशीच नववर्षाच सेलिब्रेशन केलं आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत दोन्ही खेळाडूंनी खणखणीत शतके ठोकली आहेत. आगामी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दोघांनीही आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
जयपूरमध्ये महाराष्ट्रविरुद्ध उत्तराखंड यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने कठीण परिस्थितीत फलंदाजीला येत धमाकेदार खेळी केली. त्याने 113 चेंडूंचा सामना करत 124 धावा चोपून काढल्या. त्याने आपल्या डावात 12 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत संघाचा डाव सावरला. त्यामुळे महाराष्ट्राने 50 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 331 धावा केल्या. प्रत्युत्तरात उत्तराखंडचा संपूर्ण संघ 202 धावांवर बाद झाला आणि महाराष्ट्राने 129 धावांनी सामना जिंकला.
एकीकडे ऋतुराज गायकवाड तर दुसरीकडे सरफराज खानने गोव्याविरुद्ध फलंदाजी करताना गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अवघ्या 75 चेंडूंमध्ये 157 धावांची वादळी खेळी केली. चौफेर फटकेबाजी करत त्याने 9 चौकार आणि 14 षटकार ठोकले. सरफराजच्या जोडीने त्याचा भाऊ मुशीर खानने सुद्धा 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे मुंबईने 444 धावा करत गोव्याला 445 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात गोव्याचा संघ 357 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. परंतू आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला आणि मुंबईने 87 धावांनी सामना जिंकला.


























































