कॉलेजातला जिवलग दोस्त गेला!

विजय चव्हाण

>>विजय कदम

खरं सांगायचं तर या क्षणी मला काहीच सुचत नाहीये. आज सकाळी ही वाईट बातमी कानावर आली आणि मन सुन्न झालं. आज मी माझा जिवलग मित्र गमावला आहे. रुपारेलमधल्या आमच्या असंख्य आठवणी आहेत. आमच्यात इतकी घट्ट मैत्री होती की त्यावेळी आम्ही एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारायचो. माझे वडील सिगारेट ओढायचे तर विजूचे वडील तपकीर…त्यामुळे आम्ही एकमेकांना कधी कधी तंबाखू किंवा तपकीर ओढण्याच्या सांकेतिक खुणा करून बोलवायचो.

कॉलेजमधलं टॅलेंट स्पर्धेतील त्याचं काम बघून तो ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे लक्षात आले. तिसऱया वर्षाला असताना मी रमेश पवार लिखित ‘सायलेन्स, खटला चालू हाय’ ही एकांकिका दिग्दर्शित केली. त्यात विजूने ऍडव्होकेट खोटे ही भूमिका साकारली. त्या भूमिकेने अक्षरशः सर्वांवर जादू केली. पुढे आम्ही काही मित्रांच्या साथीने ‘रंगतरंग’ची स्थापन केली. खुल्या एकांकिका स्पर्धेतही त्याने अनेक पारितोषिके आपल्या नावावर केली.

पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूरटूर’ नाटकातून त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले अन् त्याच्या करीयरची गाडी सुसाट वेगाने सुटली. ‘मोरूची मावशी’ त्याने अजरामर केली. मालिका असो, चित्रपट असो किंवा रंगभूमी, तिन्ही माध्यमांतून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले कायमचे स्थान निर्माण केले. गेल्या काही वर्षांत आमची फारशी भेट व्हायची नाही. विजू मोबाईल वापरत नसल्याने तो घरी असेल तरच संपर्क व्हायचा. गेल्या काही वर्षांत त्याची प्रकृती देखील खालावली होती. अनेकदा त्याला रुग्णालयात उपचारासाठी जावे लागायचे. नेहमीप्रमाणे आताही तो या संकटातून सुखरूप बाहेर येईल असे वाटले होते, पण माझा जिवलग सखा आज माझ्यापासून कायमचा दुरावला. आपल्या कामाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या तो कायम स्मरणात राहील. मिस यू विजू!

विजय चव्हाण यांच्या पार्थिवावर मुलुंड हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकामंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेत्री अलका कुबल, विजय कदम, अशोक समेळ, संग्राम समेळ, प्रिया बेर्डे, प्रदीप कबरे, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, केदार शिंदे, पुरुषोत्तम बेर्डे, आशालता वाबगावकर, राजन भिसे, विजय केंकरे, प्रदीप पटवर्धन, जयंत वाडकर, विनय येडेकर, कुमार सोहोनी, महेश कोठारे, अतुल परचुरे, विजू खोटे, भरत जाधव, संजय नार्वेकर, सुशांत शेलार, रवींद्र बेर्डे, प्रकाश वाणी, सुनील बर्वे आदी यावेळी उपस्थित होते. मराठी सिने-नाट्यसृष्टीतील विनोदाची परंपरा पुढे नेण्यात विजय चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. अगदी दादा कोंडकेंपासून ते आताच्या पिढीतील भरत जाधवपर्यंत अनेक कलाकारांसोबत त्यांनी अगदी सहजतेने काम केले. ते तरुण कलाकारांचे लाडके ‘मामा’ होऊन गेले. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूरटूर’ या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘मोरूची मावशी’ या नाटकातील इरसाल भूमिकेमुळे. या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्राrचे पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या ‘टांग टिंग टिंगा’ या नृत्याने तर अक्षरशः मराठी प्रेक्षकांना थिरकायला लावले.

मिलमधील नोकरी सांभाळून केले नाटकांचे प्रयोग
विजय चव्हाण यांचे नाव घेताच डोळय़ांसमोर उभी राहते ते ‘टांग टिंग टिंगा’ करत रंगमंचावर धुमाकूळ घालणारी मोरूची मावशी. आपल्या कारकीर्दीत ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘टूरटूर’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. परंतु ‘मोरूची मावशी’ या नाटकातली त्यांनी साकारलेली मावशी मराठी प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना आधी विचारण्यात आले होते, पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण यांचे नाव निर्मात्यांना सुचवले होते. ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकात त्यांनी साकारलेली गणपत ही भूमिकाही विशेष भाव खाऊन जाते. त्यावेळी चव्हाण मफतलाल मिलमध्ये नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला.

”विजय म्हणजे हरहुन्नरी, निर्मळ मनाचा, सदैव दुसऱयाला मदतीचा हात देणारा कलाकार. अजातशत्रू होता. त्याने ‘मोरूच्या मावशी’त जे टायमिंग साधले ते मला वाटत नाही की कुणा नवीन नटांना जमेल. दूरदर्शनच्या ‘गजरा’ कार्यक्रमात ‘टांग टिंग टिंगाक’ हे गाणे दाखवले आणि त्या क्षणापासून नाटक आणि मोरूची मावशी प्रेक्षकांच्या गळय़ातील ताईत बनली. ‘मोरूच्या मावशी’चे दीड हजार प्रयोग आम्ही एकत्र केलेत. विजूच्या जाण्याने चांगला मित्र गमावला.”
– प्रदीप पटवर्धन

”मराठी चित्रपटसृष्टीने एक चांगला अभिनेता गमावला असेल, पण मी माझा एक चांगला मित्र गमावल्याचे आधिक दुःख आहे. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. अभिनय करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती. कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसत होते. आजच्या नव्या कलाकारांनी त्यांच्याकडून हे कौशल्य शिकायला हवे. विजय चव्हाण यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
– अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

”माझा आणि समिरचा अत्यंत जवळचा माणूस. इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला तो जवळचा वाटायचा. अजातशत्रू असा तो माणूस होता. मावशी म्हणून त्याने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. रसिकश्रोत्यांना आनंद दिला होता. आमचा अत्यंत जवळचा मित्र गेल्याचे खुप दुःख आहे.”
-अलका कुबल-आठल्ये

”रसिकांना त्यांनी हसवलेच. सेटवर आम्हालाही खळखळून हसवले. नव्याने जेव्हा ‘मोरूची मावशी’ आले तेव्हा मी त्यांना फोन केला होता. ते म्हणाले, तूच कर. त्यांच्या हस्तेच या नाटकाचा मुहूर्त झाला. वडीलधारी माणसांप्रमाणे बोट धरून त्यांनी मला शिकवले.”
-भरत जाधव

‘टूरटूर’चे कास्टिंग सुरू होते तेव्हा विजय कदम आणि विजय केंकरे यांनी एका मुलाला बोलावले. दुसऱया दिवशी तो आल्यानंतर त्याने ऑडिशन दिली. त्याने ज्या पद्धतीने वाचले मी त्याला तिथल्या तिथले या नाटकात गुजराती विद्यार्थ्याची भूमिका देऊन टाकली. तो अत्यंत व्यावसायिक होता. नियमित यायचा, अतिशय शिस्तबद्ध होता.
-पुरुषोत्तम बेर्डे