
जत नगरपालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय 38) यांची गोळ्या घालून व डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना जत-शेगाव रस्त्यावरील अल्फोन्स शाळेजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यासह सांगली जिह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ताड यांच्या हत्येचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
विजय ताड हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी शुक्रवारी दुपारी आपल्या इनोव्हा कारमधून अल्फोन्स शाळेत जात होते. शाळेच्या अलीकडे काही अंतरावर काहीजणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. गाडी बंद पडल्याने ताड हे गाडीतून उतरून जत-सांगोला रस्त्यावरील अल्फोन्सो स्कूलकडे पळत सुटले. त्यांचा पाठलाग करत हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला लागल्याने ते खाली पडले. त्यानंतर हल्लेखोरांनी मोठा दगड त्यांच्या डोक्यात घातला. यात ताड यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या घटनेने जत व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पोलिसांसह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, खून का झाला व कुणी केला, याचा तपास जत पोलीस करीत आहेत. ताड यांच्या समर्थकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांची अधिक कुमक मागवली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या.