नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? वाघांच्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक

जर पुन्हा वाघाच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांचे प्रेत वनविभागाच्या कार्यालयाबाहेर ठेवून असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. तसेच नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला.

चंद्रपुरात आठ दिवसांत वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, पालकमंत्र्यांनी, वनमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे. आठ दिवसांत आठ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले हे वाघ शाप आहे की वरदान? शेतकरी आणि शेतमजूरांचे जगणे कठीण झाले आहे. जंगलाच्या बाजूला असलेल्या शेतीला कुंपण घालावे, ही आमची मागणी आहे. नुकसानभरपाई देऊन तुम्ही लोकांचे जीव परत आणू शकत नाही. वनविभागाच्या लोकांचा बळी द्या आणि त्यांना पैसे द्या असे वडेट्टीवार म्हणाले.

तसेच वाघांच्या हल्ल्याबात पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी, ज्यांना अधिवास कमी पडत आहे अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी. यापुढे वाघांचा बंदोबस्त झाला नाही आणि वाघाच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर ते प्रेत आम्ही वनविभागाच्या कार्यालयासमोर ठेवू. जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.