कोण सत्तेसाठी गेला की विकासासाठी, याचे आमच्याकडे पुरावे; विजय वडेट्टीवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्या दाव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चोख प्रत्युत्तर देत अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी रविवारी कोल्हापूर येथे सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. महाविकास आघाडी सरकार ज्या दिवशी पडत होते, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केले आणि ते पत्र नेत्यांना दिले. या पत्रात म्हटले होते की महायुतीत सामील व्हा. हे खोटे असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. आम्ही केवळ जनतेच्या कामांच्या दबावापोटी सत्तेत सहभागी झालो आहोत, असा दावा अजित पवार यांनी केला. त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, कोणी काहीही म्हणू देत, कितीही इमानदारीची भाषा करू देत. आमच्याकडेही पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलाय? कोण सत्तेसाठी गेलाय? कोण सेवेसाठी गेलाय? कोण विकासासाठी गेलाय आणि कोण ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या दबावात गेलाय? आमच्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी, आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या गोष्टी, कोर्टाच्या आदेशापासून सगळे उघड करू. त्यामुळे तुम्ही जी धमकी देताय, इशारे देताय, ते सहन करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आम्ही नाही. योग्यवेळी सर्व पुरावे बाहेर काढू, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सोडून तिकडे गेलात, ते कशासाठी गेलात हे जनतेला माहिती आहे. तुम्ही किती पापं लपवली तरी कशामुळे गेलात हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.