साम.. दाम.. दंड.. भूखंड! मीरा भाईंदर येथे 200 कोटींचा भूखंड 3 कोटींत घेतला; वडेट्टीवार यांचा परिवहन मंत्री सरनाईक यांच्यावर स्ट्राइक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा पुढे आलेला असताना आता महायुतीमधील मंत्री प्रताप सरनाईक यांचा जमीन घोटाळाही पुढे येणार आहे. मीरा-भाईंदरमधील दोनशे कोटी रुपयांची जमीन तीन कोटी रुपयांना विकत घेतल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. या घोटाळय़ावर आपण लवकरच सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात जमिनीचे मोठे स्कॅम होत आहेत. जमीन लुटली जात आहे. पुण्यात एक लाख कोटी रुपयांचा जमीन घोटाळा आहे. पुण्यातील बिल्डर, राजकारणी यांच्याकडून जमीन बळकवण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र राज्यात सध्या जमीन घोटाळय़ांची मालिका सध्या सुरू झालेली आहे. या सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मीरा-भाईंदरमध्ये चार एकर मोक्याची जमीन दोनशे कोटी रुपये आहे ती तीन कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का, असा सवालही त्यांनी केला. यावर आपण एक-दोन दिवसांत सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले

महाराष्ट्र लुटो आणि बेचो

मंत्र्यांना अशा प्रकारे जमीन विकत घेता येऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र लुटून खा. आम्ही डोळे बंद करून बसतो. आओ महाराष्ट्र लुटो महाराष्ट्र बेचो अशीच वेळ या सरकारकडून अपेक्षित आहे. हे घोटाळे थांबले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.