हिंदुस्थानींच्या स्वप्नांना पुन्हा पंख, ‘विक्रम’ चंद्रावर सापडला…

चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटरचा पल्ला उरलेला असतानाच चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशवासीयांच्या चेहर्‍यावर निराशा दाटून आली. आता विक्रम लँडरचे काय होणार? त्याच्याशी संपर्क होईल का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर शास्त्रज्ञांच्या डोक्यात माजले. असे असताना इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज रविवारी आनंदाची बातमी दिली. विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून त्याचे फोटो ऑर्बिटरने काढले आहेत. आता आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत, अशी माहिती सिवन यांनी वृत्तसंस्थेला दिली. विक्रमचे ठिकाण सापडल्याने आता शास्त्रज्ञ आणि हिंदुस्थानवासीयांच्या स्वप्नांना पुन्हा पंख फुटले आहेत. विक्रमने चंद्राला गवसणी घातली असून आता  त्यातील प्रज्ञानला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान  शास्त्रज्ञांसमोर असणार आहे. याबाबत देशभरात प्रचंड उत्कंठा असून सर्वत्र प्रार्थना आणि नवस केले जात आहे.

विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला असला तरीही इस्त्राsचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आगामी 14 दिवस आम्ही विक्रमसोबत पुन्हा  संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे सिवन यांनी म्हटले होते. चांद्रयान-2 मोहीम ही 95 टक्के यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर आज विक्रम सापडल्याची माहिती देताना त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसत होता. विक्रम कुठे आहे कळले असून त्याच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच त्याच्याशी संपर्क साधू असे त्यांनी म्हटले आहे.

सॉफ्ट नाही, हार्ड लँडिंग

विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. विक्रमचे हार्ड लँडिंग झाले. ज्याठिकाणी लँडर उतरायला हवे होते त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर त्याचे लँडिंगदूर झाले आहे. जी छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून त्याचे हार्ड लँडिंग झाल्याचेच दिसत असल्याचे सीवन यांनी सांगितले. त्याचे हार्ड लँडिंग झाल्यामुळे तो कुठल्या स्थितीत आहे. त्याचे काही नुकसान झाले आहे का? याबद्दल काहीच कळू शकलेले नाही. त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही त्याच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

हार्ड लँडिंग म्हणजे काय

विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्याचे ऑर्बिटरने काढलेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहेविक्रम लँडरच्या कार्यप्रणालीत काही तांत्रिक बिघाड झाला असेल. त्यामुळेच तो वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळला असावा. त्यालाच हार्ड लँडिंग असे म्हणतात.

 500 मीटरवर फिरेल प्रज्ञान

विक्रम लँडर सुस्थितीत असल्यास त्यातून 6 पायांचा प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. त्यानंतर तो 500 मीटर अंतरापर्यंत फिरेल. चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो तो इस्त्राsला पाठवेल. 27 किलोग्रॅमचा हा प्रज्ञान रोव्हर म्हणजे एक रोबोट वाहन आहे.

ऑर्बिटर सुस्थितीत असून तो उत्तम काम करत आहे. n ऑर्बिटर कॅमेरे हाय रेझ्युलेशन कॅमेरे असून त्याच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाची सुस्पष्ट छायाचित्रे इस्रोला मिळत आहेत. n चंद्राच्या भुपृष्ठाचा अभ्यास करण्यासाठी आठ उपकरणे पाठवण्यात आली आहेत.  nऑर्बिटर चंद्रापासून 100 किलोमीटर अंतरावरून चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. चंद्रापासून 100 किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालत असतानाच त्याने काही छायाचित्रे इस्त्राsला पाठवली. nऑर्बिटर साडेसात वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतो.

देशवासीयांनी आणि मोदींनी आमचे मनोबल वाढवले

संपूर्ण देशातून आम्हाला मिळालेला पाठिंबा आणि मोदींनी धीराचे दोन शब्द बोलून आमचे मनोबल वाढवल्याचे सिवन यांनी म्हटले आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या इतके जवळ जाऊन विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने आम्ही प्रचंड निराश झालो होते. परंतु, मोदींनी आणि देशवासीयांनी आमचा आत्मविश्वास वाढवल्याचे ते म्हणाले. मोदींनी इस्त्राs प्रमुख सिवन आणि शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह वाढवल्याचे इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन म्हणाले. तर देशाने इस्त्राsला दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा शास्त्रज्ञांसाठी अत्यंत मत्त्वाचा होता अशी भावना इस्रोचे दुसरे माजी प्रमुख ए.एस.किरण कुमार यांनी व्यक्त केली.

प्रज्ञानला बाहेर काढण्याचे प्रयत्न 

विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रज्ञान रोव्हर आहे. विक्रम लँडरशी संपर्क झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला बाहेर काढणे हे शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हा प्रज्ञान चंद्राच्या भूपृष्ठावरून फिरून तेथील माहिती इस्रोला पाठवणार आहे. तेथील मातीचे नमुने तसेच इतर छायाचित्रे पाठवणार आहे. त्यातून नव्या माहितीचा खजिना उलगडणार आहे.

ऑर्बिटरने हाय रिझॉल्युशन कॅमेर्‍यातून विक्रम लँडरचा फोटो घेतला असून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. याबरोबरच विक्रमशी संपर्क का तुटला याची कारणेही शोधली जात आहेत.

देशाला मिळाले इस्रो स्पिरीट  

चांद्रयान-2 मोहिमेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. 7 सप्टेंबरची सकाळ हिंदुस्थानवासीय कधीच विसरू शकत नाहीत. इस्रोमुळे देशाला सकारात्मकतेची प्रेरणा मिळाली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हरयाणात भाजपच्या विजयी संकल्प रॅलीत ते बोलत होते.  7 सप्टेंबरच्या रात्री 100 सेकंदांत जे घडले त्यामुळे संपूर्ण देशाला एकत्र आणले. यशापयशापलीकडे पाहाण्याची शक्ती या मोहिमेने देशवासीयांना दिली, असेही ते म्हणाले.

इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी नासा

इस्रोने केलेली कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे नासाने म्हटले आहे. नासाने ट्विटरच्या माध्यमातून नासाच्या अंतराळ मोहिमेचे कौतुक केले आहे. तसेच भविष्यातील अंतराळ मोहिमांचे नियोजन आपण एकत्र करू अशी आशा आहे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 उतरवण्याच्या इस्रोच्या मोहिमेचे तसेच प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. इस्रोचे प्रयत्न हे एकमेवाद्वितीय असे होते, अशा शब्दांत त्यांनी इस्रोच्या मोहिमेचे कौतुक केले आहे.

प्रत्येक क्षण महत्त्वाचा

प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी आता 12 दिवस उरले आहेत. वेळ अतिशय वेगाने पुढे सरकत असून हा काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. मात्र, विक्रम लँडरचे जे फोटो ऑर्बिटरने पाठवले आहेत त्यावरून चांद्रयान– 2 मोहीम योग्य दिशेने जात असून अजूनही आशा असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील ट्विट करून इस्रोचे कौतुक केले. हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा याला चंद्रावरून हिंदुस्थान कसा दिसतो असे विचारले तेव्हा त्याने सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमाराअसे उत्तर दिले होते.
मला खात्री आहे की, इस्रो केवळ चंद्रावरच नव्हे तर आकाशगंगेत पोहोचेल आणि त्यावेळी आपण अभिमानाने सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमाराअसे म्हणू, असे ट्विट करत सचिनने इस्रोला
सलाम केला.

आपली प्रतिक्रिया द्या