
ऐन दिवाळीत विलेपार्ल्यात चोरांची दिवाळी सुरू झाली आहे. सायकलचोरी तसेच महिलांचे मंगळसूत्र खेचून पळवण्याचे प्रकार वाढले आहेत.
त्यामुळे भयभीत पार्लेकरांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पोलिसात धाव घेतली आहे. या अज्ञात चोरांचा तातडीने बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
विलेपार्ले पूर्व विभागात दिवाळीच्या तोंडावर चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळ खरेदीसाठी महिला वर्ग आवर्जुन बाजारहाट करतो. बाजार गजबजलेले असतात. अशा महिलांना काही अज्ञात बाईकस्वार पत्ता विचारण्याच्या बहाण्याचे बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने खेचून पळ काढतात. त्यात महिला जखमीही होत आहेत. परंतु त्यांच्या जीवाची पर्वा न करता बाईकस्वार चोरटे दागिने खेचून नेतात. बाईकस्वारांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांना ओळखणेही कठीण होते.
पार्ल्यातील या घटनांची परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सूचनेवरून विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि नागरिकांनी विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अलका मांडवे यांची भेट घेतली. चोरटय़ांचा तातडीने बंदोबस्त करावा असे निवेदन त्यांना दिले.
याप्रसंगी महिला विधानसभा संघटक रुपाली शिंदे, उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, विभाग अधिकारी सिध्देश पवार, महिला शाखा संघटक अपर्णा उतेकर, मुंबई समन्वयक प्रकाश सकपाळ, शाखाप्रमुख अनिल मालप, नितेस गुरव, दशरथ साबळे, विश्वास पाटेकर, जितेंद्र शिर्पे, मधुकर गुरव, आनंद पाठक आदी उपस्थित होते.





























































