
सामना प्रतिनिधी । कुडाळ
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकणात पावशी – घावनळे फाटा येथे भुयारी मार्ग (बॉक्सवेल) मागणीसह पावशी व वेताळबांबर्डे येथील अंडरपासच्या मागणीबाबत पावशी, घावनळे व वेताळबांबर्डे दशक्रोशी विकास समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत प्रशासानाकडून आवश्यक ती कार्यवाही व्हावी अन्यथा 21 नोव्हेंबर रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर जनआंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र पावशी- घावनळे फाटा येथे घावनळे दशक्रोशीतील गावांसाठी महामार्ग नियोजन आराखड्यात कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही. पावशीसह वेताळबांबर्डेत ब-याच त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावशी, आंबडपाल, मुळदे, मांडकूली, तुळसुली, घावनळे, निवजे, वेताळबांबर्डे, हिर्लोक, नारूर आदी गावातील शेकडो ग्रामस्थ व वाहनधारकांना समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. या गावांसाठी आराखड्यात कोणतेही नियोजन केलेले नाही. याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी दशक्रोशीतील ग्रामस्थांची नाराजी असून असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत प्रशासानाकडून अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
पावशी – घावनळे फाटा येथे कोणतीही तरतुद नसल्याने तेथे बॉक्सवेल व सर्व्हिस रोड करण्यात यावा. पावशी लिंगमंदीर ते कुंभारवाडी येथे शेतक-यांना शेतीविषयक कामकाजासाठी अंडरपासची तरतुद करावी आणि वेताळबांबर्डे तेलीवाडी येथे अंडरपासची तरतुद करावी. या तिन्ही मागण्यांबाबत प्रशासानाकडून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून न्याय द्यावा अन्यथा 21 रोजी महामार्गावर जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिला. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी ग्रामस्थांचे हे निवेदन स्विकारले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री, आमदार व खासदार तसेच संबंधित प्रशासन यांनाही या निवेदनाची प्रत पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सभापती राजन जाधव, आबा मुंज, धीरज परब, सरपंच भिकाजी कोरगांवकर, श्रीपाद तवटे, प्रसाद गावडे, दिपक आंगणे, गुरूनाथ चव्हाण, दिनेश वारंग, प्रथमेश धुरी आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



























































