
महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरणाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेला मदनवाडी ग्रामस्थांचा विरोध असून यापूर्वी झालेल्या अनेक पाणीपुरवठा योजना निष्फळ ठरल्या आहेत. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’, अशी परिस्थिती मदनवाडी गावाची झाली आहे. सध्याची जलजीवन मिशन योजना उजनी बॅकवॉटरऐवजी शिर्सुफळ तलाव किंवा शेटफळगढे कॅनॉल रुन योजना राबविण्यात यावी, अशी मागणी मदनवाडी बचाव कृती समितीचे दादासाहेब थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मदनवाडी गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी योजना उजनी बॅक वॉटरमधून न करता खडकवासला कालव्यावरून करण्यात यावी, उजनीचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होणार आहे. प्राधिकरणाने दौंड तालुक्यातील अनेक योजनांचे उद्भव स्त्रोत बदलले असून मदनवाडीचा स्त्रोत देखील बदलावा अन्यथा होणारी योजना निरुपयोगी ठरणार आहे. तात्कालीन ग्रामपंचायत कमिटीने ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक असताना मासिक मिटिंगचा ठराव जोडला केल्याने कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत.
मदनवाडीच्या सरपंच अश्विनी बंडगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागील ठराव रद्द करून नवीन ठराव करण्याच्या सूचना ग्रामसेवक एस. बी. गाताडे यांना दिल्या. गावात अनेक पाणी रवठा योजना झाल्या, मात्र नियोजनाअभावी सर्व योजना निकामी ठरल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कायमस्वरुपी विकत घ्यावे लागते. तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्याप तसाच राहिल्याने विकतचे पाणी वापरून पुरुषांचे खिसे, मात्र मोकळे होऊ लागले आहेत. नवीन होणारी योजना तरी योग्य प्रकारे व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.
उजनीचे पाणी अपायकारक
उजनीचे पाणी पिण्यास योग्य नाही त्याच बरोबर सांडपाणी म्हणुन वापरण्यासही अपायकारक आहे. उजनीच्या पाण्याने कर्करोग, मूत्रपिंड, त्वचारोग यासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे गर्भवती महिलांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे उजनीवरील योजना रद्द करून खडकवासला कॅनॉलवरून मदनवाडी तलावाशेजारी टॅंकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
यापूर्वी ग्रामपंचायतीने नागरिकांना विचारात न घेता उजनी जलाशयावरून योजना करण्याचा घेतलेला निर्णय जनहितास बाधा आणणारा आहे. यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि कामाची झालेली निविदा सुधारित पद्धतीने करावी. योजना खडकवासला कालव्यावरून करण्यात यावी अन्यथा मदनवाडी बचाव कृती समिती पुढील आठ दिवसांत सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहे, असे निवेदन मदनवाडी बचाव कृती समितीने ग्रामपंचायत आणि कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, नानासाहेब बंडगर, माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते, भिमशक्ती संघटनेचे सरचिटणीस शरद चितारे, ग्रामपंचायत सदस्य अतुल देवकाते, जयपाल बंडगर,कुंडलिक बंडगर आदी उपस्थित होते.

























































