जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी ग्रामस्थांचा महामार्गावर ठिय्या

432

राष्ट्रीय महामार्गासाठी येथील अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने तो तात्काळ मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दहा वाजता महामार्गावरच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ दोन्ही बाजूस गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 हा चापोली मधून जात आहे. यासाठी सध्याच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. मार्च 2018 मध्ये येथील संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्याचा मोबदला मिळाला नाही. यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे सतत खेटे मारूनही दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. निवेदन दिल्यानंतरही त्यावर समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी बुधवारी अखेर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी दहा वाजता महामार्गावर येथील ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले. काही क्षणातच दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र शब्दात प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी अहमदपूर येथील भूसंपादन कार्यालयाचे पत्र ग्रामस्थांना दिले व लवकरात लवकर मावेजा ग्रामस्थांना मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अजिंक्य चामे, बालाजी पाटील चाकूरकर, प्रभाकर होनराव, निलेश मद्रेवार, लक्ष्मण पेटकर,रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या