
सामना ऑनलाईन । हैदराबाद
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना विविध नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. प्रचारसभेला गर्दी होण्यासाठी नेते वेगवेगळ्या कुप्त्या वापरत आहेत. मात्र, अशा कुप्त्या फसल्याने नेत्यांना तोंडघशी पडावे लागते. असाच प्रकार तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेत घडला. राव यांची खम्मम जिल्ह्यात होणाऱ्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना आणले. मात्र, सभेला येण्यासाठी पैसे देण्याचे आश्वासन नेत्यांकडून देण्यात आले होते. पैसे मिळाले नसल्याने गावकऱ्यांनी सभेतच धरणे आंदोलन सुरू केले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आणि प्रशासनाला कसरत करावी लागली.
चंद्रशेखर राव यांची सभा यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना पैसे देण्याचे प्रलोभन दाखवून गाडीत भरून सभेसाठी आणले होते. सभेला आल्यावर पैसे देण्यात येणार होते. मात्र, पैसे मिळाले नसल्याने सभेसाठी आलेल्या लोकांनी जवळच्या रस्तावर येऊन रास्ता रोको केला आणि रस्त्यावरच बसून धरणे आंदोलन केले. आंदोलकांना पागंवण्यासाठी पोलिसांना आणि प्रशासनाला कसरत करावी लागली. या घटनेचे वृत्त पसरताच चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीवर टीका होत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला जनतेचा पाठिंबा नसून पैसे देऊन सभेसाठी गर्दी जमवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, विरोधकांचे आरोप फेटळून लावत आपली सभा उधळण्यासाठीच विरोधकांनी त्यांची माणसे पाठवल्याचा आरोप तेलंगणा राष्ट्र समितीने केला आहे.
या सेभत राव यांनी काँग्रेस आणि भाजपवर कडाडून टीका केली. मात्र, राव यांच्या भाषणापेक्षा सभेसाठी आलेल्या लोकांनी केलेले आंदोलन हाच चर्चेचा विषय़ ठरला आहे. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असल्याने हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.


























































