धोकादायक सोनवी पूलावरील खड्डे ग्रामस्थांनीच भरले; एकतेचे दर्शन

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ भरा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे चाकरमान्यांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. संगमेश्वर येथील सोनवी पूलाला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे या पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु होती. खड्ड्यांमुळे पूलाची झालेली दुरवस्था पाहून संगमेश्वर येथील रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील युवकांनी एकत्र येत सोनवी पूलावरील खड्डे भरुन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे. या कृतीतून ग्रामस्थांनी एकतेचेही दर्शन घडवले.

सोनवी पूल हा ब्रिटिश कालीन आहे. 1937 मध्ये उभारलेला हा पूल धोकादायक बनला आहे. मात्र अनेक ठिकाणी तडे गेले आहेत तसेच वाहने जाताना हलणारा पूल धोकादायक नसल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगितले जात आहे. या पूलावर गणेशोत्सवापूर्वी अनेक खड्डे पडले. परिणामी ऐन उत्सवात एकेरी वाहतूक सुरु ठेवल्याने दुतर्फा वाहनांच्या दोन किमी लांब रांगा लागत होत्या. पूलावरील जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पूल अधिकाधिक धोकादायक बनत असताना ठेकेदार कंपनी अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करीत होते. याचा वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.

मंगळवारी असणारे गणेश विसर्जन आणि त्यानंतर परत महामार्गावरील वाढणारी वाहतूक लक्षात घेत संगमेश्वर रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील 15 ते 20 युवकांनी खडी, जांभा दगड, जेसीबी आदि सामग्री आणून सुमारे दोन तासांचे श्रमदान करत सोनवी पूलावरील सर्व खड्डे भरुन सामाजिक बांधिलकीचे आणि हिंदू मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडवले. रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील हिंदू मुस्लिम युवकांच्या या संवेदनशील कृतीबद्दल आमदार शेखर निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या