अनेक चांगले प्रकल्प राज्याबाहेर पाठवले, या विनाशकारी प्रकल्पासाठी सरकारची दडपशाही का; विनायक राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी बारसू रिफायनरी संदर्भात मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या मांडत सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीची आणि पोलीसी बळाचा गैरवापर करत दहशत पसरवण्याबाबतची माहिती दिली. कोणत्याही प्रकारे हा प्रकल्प दामटवण्यासाठी सरकार जनतेवर अन्याय करत आहे. आम्ही ही दडपशाही खपवून घेणार नाही. आम्ही येथील स्थानिकांच्या पाठिशी ठामपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहोत, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

राजापूरमधील बारसू, सोलगावसह तीन गावात प्रस्तावित रिफायनरी आणण्यासाठी राज्या सरकराच्या यंत्रणेमार्फत गावकऱ्यांचा छळवाद सुरू आहे. त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने, संयमाने लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडणाऱ्या ग्रामस्थांची गळचेपी करण्यात येत आहे. पोलिसी दंडुक्याचा वापर करून भीतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. तेथील परिस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

आपण कालच एका आंब्याच्या झाडाखाली बसून तेथील रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. आपली जमीन वाचवण्यासाठी स्थानिक आंदोलन करत आहेत.शांततेच्या मार्गाने जनतेचे आंदोलन सुरू असूनही तेथे पोलीस छावणी उभारण्यात आली आहे. ते कमी म्हणून की काय एसआरपीच्या तुकड्याही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे तेथे आंदोलकांची गळचेपी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे. मुंबईतून जाणाऱ्या चाकरमान्यानांही त्रास देण्यात येत आहे. रात्री चाकरमान्यांच्या घरी जात त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. चर्चेसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना तडीपार करण्यात येत आहे. काहीजणांना कोंडून ठेवतात. इतर खटल्यात परत अटक करतात. स्थानिकांची गळचेपी करत रिफायनरी दामटून नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आम्हाला रिफायनरी नको, आमचे म्हणणे एकून घ्या, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन पत्रे रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवली आहेत. ही पत्रे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही देण्यात आली आहे. मात्र, दुर्दैवाने कोणीही या पत्रांची दखल घेतलेली नाही. गेल्या सात वर्षांपासून रिफायनरीविरोधात शांततेने आंदोलन करण्यात येत आहे. कधीही आंदोलनाला हिंसक वळण लागलेली नाही. मात्र, आता गावात पोलीस बळाचा वापर करत दहशत निर्माण करण्यात येत आहे.

आंदोलनासाठी आलेल्या वृद्धांना आणि महिलांना पोलिसांनी फरफरट दूर नेले. अनेकांना यात मार लागला आहे. 130 महिला आंदोलकांना पकडून त्यांना पोलिसांच्या गाडीत फेकण्यात आले. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. अंत्यत अमानूषपणे मारहाण होत आहे. गरज पडली तर गोळीबार करू, अशी धमकीही देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांचा निर्दयीपणा बारसू गावात दिसत आहे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. येथील परिस्थिती बाहेर कोणालाही कळू नये, यासाठी या पूर्ण परिसरात पत्रकारांनाही बंदी करण्यात आली आहे. येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना अडवण्यात आले.

माहिती मिळवण्याच्या पत्रकारांनाही माहिती देण्यात येत नाही. मिडीयाचिही दडपशाही सुरू आहे. काल आपल्यालाही अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही आंदोलनकांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. सरकारने आमचे म्हणणे समजून घ्यावे, आमच्याशी चर्चा करावी असे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र, शासन चर्चेपासून पळ का काढत आहे. जनतेच्या मनातीश शंकानिरसन करत ग्रामस्थांच्या सहमतीने प्रकल्प राबवण्याचे काम सरकारचे आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना पुढे करण्याऐवजी सरकारने पुढाकार घेत चर्चा करण्याची गरज आहे. आपण सरकारला चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

स्थानिक, जाणकार यांचा चर्चेत सहभाग हवा. मात्र, जाणकार, आंदोलकांना तडीपार करत समर्थकांसमोर प्रेंझेटेशन करण्यात आले. निर्भय वातावरणात चर्चा करण्यासाठी पोलीसांना हटवत सरकारने चर्चा करण्यासाठी यावे. या प्रकल्पाबाबत जनतेच्या शंका दूर करत त्यांच्या सहमतीने, संवादाने चर्चेने हे काम करायला हवे. याऐवजी जर पोलिसी बळाचा वापर करत हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे दुर्दैवी आहे.

आम्ही स्थानिकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारसू परिसरातील पाच गावात भेट देत त्यांचे म्हणणे समजून घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला जनतेशी सुसंवाद साधण्याचे आणि पोलिसी बळाचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या निर्ढावलेल्या सरकारने कोणाचेही विनंती मान्य केलेली नाही. हे निषेधार्ह आहे. तेथील ग्रामसंभांनी यापूर्वीच रिफायनरीविरोधी ठराव केले आहे. ते त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे. मात्र, केंद्राचा प्रकल्प असल्याने त्याला ग्रामसभेचे ठराव चालणार नाही, असे प्रशासनानचे म्हणणे आहे.

ही जुलमी राजवट अंमलात आणण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसला आहात, की जनतेचा आक्रोश एकण्यासाठी बसला आहात. जनतेच्या आक्रोशाची त्यांच्या समस्यांची दखल घ्या. तसेच रिफायनरीचे फायदे सांगण्य़ासाठी जनतेशी संवाद साधा. सर्वात आधी पोलिसांची दडपशाही थांबवा, असे आवाहनही विनायक राऊत यांनी केले. बारसू परिसरात गेल्या दीड 133 परप्रांतीय लोकांनी जमीनी खरेदी केल्या आहेत. एखाद्या प्रकल्पाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर तेथे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत, असा नियम आहे. मात्र, राज्यातील आणि परप्रांतीय भूमाफीया येथील दलालांना हाताशी धरून नियम धाब्यावर बसवत जमीनी खरेदीविक्री सरू आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

आज करण्यात आलेले प्रेंझेटेशन म्हणजे फसवणूक, नौटंकी आहे. यात कोणीही जाणकार नाहीत. त्यामुळे हा फक्त देखावा आहे. याला काहीही अर्थ नाही. जनतेशी संवाद साधत हे काम झाले पाहिजे. बळाचा वापर करत गैरमार्गाने प्रकल्प का दमटवण्यात येत आहे. आम्ही या बाबत स्थानिकांसोबत ठामपणे उभे आहोत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच याभागात भेट देत जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी या गावाची सूचना देताना जनतेची सहमती महत्त्वाची आहे, असे स्पष्टपणे म्हटले होते. सरकारने चांगले प्रकल्प राज्याबाहेर पाठवले. मात्र, निसर्गाचे नुकसान करणार हा एकच प्रकल्प राज्य सरकारला कशासाठी हवा आहे, असा सवालही त्यांनी केला.