विनायक राऊत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार, केळवली येथील सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. राजापूर तालुक्यातील प्रचारसभांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. केळवली जि.प.गटाच्या सभेत खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून आणून हॅटट्रीक करण्याचा निर्धार करण्यात आला.

केळवली जि.प.गटाच्या प्रचार सभेत मार्गदर्शन करताना कोकणावर सिडकोच्या माध्यमातून होत असलेल्या अतिक्रमणाबाबत जनजागृती केली. सिडकोच्या नियंत्रणाखाली कोकण आल्यानंतर ग्रामपंचायतींचे महत्व संपेल. केवळ जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याकरीता ग्रामपंचायती असतील. कोकणातील जांभा दगड आणि समुद्रकिनाऱ्यावरील गावांवर धनदांडग्यांची नजर पडली आहे.

सिडकोला पुढे करून आरक्षण टाकून तुमच्या जांभा दगडाच्या खाणी, तुमच्या जमीनी हस्तगत केल्या जातील. म्हणून सिडकोला कोकणात पाय ठेवायला देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, उपनेते अरुण दुधवडकर, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, गणपत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, संपर्कप्रमुख अॅड. चंद्रप्रकांश नकाशे, समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, किशोर नारकर, मंदार सप्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा आडिवरेकर, महिला तालुकाध्यक्ष प्राची शिर्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.