या देशात हुकूमशाही चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले, खासदार विनायक राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिंदुस्थानातील जनता ही लोकशाही मानणारी आहे हुकूमशाही नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी केली.

विनायक राऊत आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत केले आहे. हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले. मोदी सरकारने या पुढे जनमताचा आदर करूनच निर्णय घ्यावेत. आपला देश लोकशाही प्रधान देश आहे इथे मनमानी कारभार चालणार नाही असेही राऊत यांनी सुनावले.