मला ऑलिम्पिक खेळण्यापासून रोखले जातेय! विनेश फोगट हिचा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप

हिंदुस्थानी कुस्ती महासंघ गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कुस्तीपटूंचे आंदोलन, वादग्रस्त निवड प्रक्रिया, त्यानंतर आता पुन्हा एकदा कुस्ती महासंघाचा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश पह्गट हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून आपल्याला रोखले जात असल्याचा आरोप हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष संजय सिंग यांच्यावर केला आहे. तसेच आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जात असल्याची भीतीही व्यक्त केली आहे.

विनेशने 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. पुढील आठवडय़ात किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणार्या आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे विनेशला 50 किलो वजनी गटात ऑलिम्पिक कोटा गाठायचा आहे. नुकत्याच पतियाळा येथे झालेल्या निवड चाचणीत 50 व्यतिरिक्त विनेशने 53 किलो वजनी गटातही भाग घेतला. 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला, मात्र 50 किलो वजनी गटात विजय मिळवल्यामुळे विनेशला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला.

विनेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे.  ‘बृजभूषण शरणसिंह आणि त्यांनी ठेवलेले डमी संजय सिंग, मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मला डोपिंगमध्ये अडकवण्याचा कट रचला जाऊ शकतो,’ असे तिने पोस्टमध्ये शेअर केले आहे.

आशियाई ऑलिम्पिक पात्रता 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. माझे प्रशिक्षक आणि फिजिओ यांना परवानगी मिळवण्यासाठी मी हिंदुस्थान सरकारला एका महिन्यापासून विनंती करत आहे. ओळखपत्राशिवाय माझे प्रशिक्षक आणि फिजिओ माझ्यासोबत स्पर्धा संकुलात जाऊ शकत नाहीत. वारंवार विनंती करूनही कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीय. कोणीही मदत करायला तयार नाही. आम्ही लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे आमच्यासोबत राजकारण केले जातेय. देशात चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची ही शिक्षा आहे का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.