म्हाडा भरतीतील पेपरफुटीची सरकारने सखोल चौकशी करावी, विनोद घोसाळकर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडातील भरती परीक्षेच्या संदर्भात झालेल्या प्रकारामुळे राज्य सरकारची व म्हाडाची नाहक बदनामी झाली असून या प्रकरणाची राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

म्हाडामध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील 565 पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेली जीए सॉफ्टवेअर कंपनी काळ्या यादीत असल्याबाबत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर आपण स्वतः राज्याचे मुख्य सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष व कार्यकारी अधिकारी तसेच म्हाडाच्या सचिवांना पत्र पाठवले आणि या कंपनीमुळे सरकार व म्हाडाची बदनामी होऊ नये याबाबत दक्षता घेण्याची विनंती केली होती. राज्यातील असंख्य उमेदवार या प्रक्रीयेत सहभागी होत असल्याने परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे होते. असे विनोद घोसाळकर यावेळी म्हणाले.

तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

काळ्या यादीत असलेली ही कंपनी म्हाडाच्या भरती प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आपण या पत्रात वर्तवली होती. या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये कंपनीने गोंधळ घातल्याचे स्पष्ट असतानाही याच कंपनीला म्हाडाच्या सरळसेवा परीक्षेचे काम दिल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचेही प्रशासनाला कळवले होते. तसेच भरती प्रक्रियेच्या संदर्भात बैठक आयोजित करण्याबाबतही कळवले होते पण या सुचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले अशी खंत विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केली.

कंपन्या दलाल – जितेंद्र आव्हाड

राज्यात शासकीय नोकर भरती करणाऱ्या कंपन्या दलाल आहेत. या कंपन्या फेकून द्या. या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी आल्या आहेत अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, म्हाडा पूर्वपरीक्षेचे पेपर फोडणारा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याकडे राज्यातील 20 ठिकाणी होणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.