व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमीर खानची पोलिसांत धाव

व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर खान एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचे आमीरचे म्हणणे आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता आमीर खानचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात आमीर एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना तसेच त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतोय. मात्र, हा व्हिडीओ बनावट असून पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे आमीरने म्हटलेय. व्हायरल व्हिडीओबाबत आमीरने संबंधित अधिकारी, यंत्रणांसह मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमकडेही तक्रार दाखल केली आहे. व्हायरल व्हिडीओप्रकरणी आमीर खानच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलेय, आमीर खानने त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन केले नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आमीरने निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसलो तरी प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमीरने केले आहे.