बाबर तिन्ही क्रिकेटचा सर्वोत्तम फलंदाज; विराट कोहलीची स्तुतिसुमने

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम फलंदाज होय, अशी स्तुतिसुमने उधळली.

एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने बाबरचे कौतुक केले. तो म्हणाला, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये बाबरशी माझी पहिली भेट झाली. पाकिस्तानी क्रिकेटर इमाद वसीमने मँचेस्टरमध्ये ही भेट घडवून आणली. बाबर आझमला तुझ्याशी बोलायचे आहे, असा निरोप इमादने आणला होता. त्यानंतर आम्ही एकत्र बसलो अन् छान गप्पा केल्या. सध्या बाबर हा क्रिकेटच्या सर्वच प्रकारात अव्वल दर्जाचा फलंदाज आहे, मात्र आजही त्याची वागणे पूर्वीसारखेच आहे. पहिल्या भेटीच्या वेळी बाबरला माझ्याबद्दल जो आदर होता तो आजही त्याच्या डोळय़ात कायम आहे. त्याची सातत्यपूर्ण फलंदाजी नक्कीच कौतुकास्पद होय. मी नेहमीच त्याची फलंदाजी एन्जॉय करतो, असेही कोहलीने सांगितले.