
ज्या दिवशी (15 नोव्हेंबर 1989) सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले तसेच ज्या दिवशी (15 नोव्हेंबर 2013) तो आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता त्याच दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबरला विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्याच साक्षीने 49 एकदिवसीय शतकांचा विश्वविक्रम मोडीत काढला आणि क्रिकेट सम्राटाने क्रिकेटच्या देवाला आगळीवेगळी मानवंदना दिली.
दोन आठवडय़ांपूर्वी वानखेडेवरच सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाच्या साक्षीने विराट कोहली सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधणार असे वाटत होते, पण तो ती बरोबरी साधू शकला नाही. तो योग नव्हता. आज योगायोगाने सारेच जुळून आले. सचिनच्या विश्वविक्रमाला मागे टाकण्याचा भीमपराक्रम विराटने सचिनच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिनी करून या दिनाचे महत्त्व आणखी वाढवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘शतकांचे अर्धशतक’ करणारा विराट दुसराच फलंदाज आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके झळकावली आहेत, तर विराटने वन डेत 50 शतके.
सचिनपेक्षा सुस्साट विराट
सचिनचे फलंदाजीतले विक्रम मोडण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती विराट कोहलीमध्ये. त्याने आता ते विक्रम मोडायला सुरुवात केलीय. सचिनने 451 वन डे डावात 49 वे शतक ठोकले होते, तर विराट कोहलीने चक्क 279 व्या डावात त्या विक्रमाला मोडण्याचा पराक्रम केला. त्याने सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 172 डाव कमी घेतले.
सचिन 49 शतके झळकावण्यासाठी तब्बल 23 वर्षे क्रिकेट खेळला होता, तर विराटने आपल्या 15 वर्षांच्या एकदिवसीय कारकीर्दीतच हा विक्रम मागे टाकला.
विराटने तिसऱ्यांदा आपल्या कारकीर्दीत एका वर्षात सहा शतके झळकावली. याआधी त्याने 2017 आणि 2018 साली सहा-सहा शतके ठोकली होती. यावेळीही त्याने आतापर्यंत सहा शतके साजरी केली आहेत.
विराटने गेल्याच महिन्यात सचिनच्या सात पॅलेंडर वर्षातील एक हजार धावांच्या विक्रमाला मोडताना आठव्यांदा हजार धावा केल्या. आता त्याने 26 सामन्यांत 1323 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक 1460 धावा 2017 साली केल्या होत्या. विराटचे हे हिंदुस्थानातील 24 वे शतक होय.


























































