वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघात धोनी हवाच! सुनील गावसकरांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गेल्या काही सामन्यांमध्ये सुमार फॉर्ममधून जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियाच्या ट्वेण्टी-20 संघातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे त्याच्या वन डे संघातील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठीच्या हिंदुस्थानी संघात त्याला स्थान मिळणार नाही अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली. यावेळी मात्र लिटलमास्टर सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करताना म्हटले की, 2019 सालामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाची गरज आहे. विराट कोहलीला आगामी वर्ल्ड कपमध्ये त्याची मोलाची मदत होईल.

ट्वेण्टी-20 व वन डे यामध्ये खूप फरक आहे. वन डेत विचार करायला जास्त वेळ मिळतो. महेंद्रसिंग धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. गरजेनुसार क्षेत्ररक्षणातील छोटे बदल करण्यात तो माहीर आहे. गोलंदाजांना हिंदी भाषेत तो समजवू शकतो. दबावाखाली कुठे चेंडू टाकावा, कुठे टाकू नये हे सांगू शकतो. विराट कोहलीसाठी त्याचा अनुभव खरोखरच उपयोगी ठरेल, असा विश्वास सुनील गावसकर यांनी यावेळी व्यक्त केला.

रोहित, अजिंक्यमुळे भार हलका

रोहित शर्माने वन डेत जबरदस्त नेतृत्व करीत देशाला दमदार विजय मिळवून दिलेत. अजिंक्य रहाणेने कसोटीत उपकर्णधाराची भूमिका उत्तम बजावलीय. या दोघांमुळे विराट कोहलीचा कर्णधारपदावरील भार हलका झालाय, असे गावसकर यावेळी म्हणाले.