विराट, तुझ्या जन्माआधीपासून हिंदुस्थान जिंकतोय! कोहलीवर भडकले गावसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ विजयामागून विजय संपादन करून विक्रमांचे इमले रचत आहे. त्यामुळे विराट सेनेचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. मात्र, माजी कसोटीपटू सुनील गावसकर हे विराट कोहलीवरच संतापले असून, त्यांनी त्याचा खरपूस समाचारही घेतला.

झाले असे की, कोलकात्यातील दिवस-रात्र कसोटी जिंकल्यावर विराट कोहलीने सौरव गांगुलीचे गुणगान गायले. 2000 सालापासून सौरवदादाने कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून ‘टीम इंडिया’ जिंकायला लागली, असे विधान त्याने केले. मात्र, सुनील गावसकर यांना विराटचे हे विधान बोचले.

ते म्हणाले, सौरव गांगुली सध्या ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे म्हणून विराट कोहलीने खूश करण्यासाठी त्याचे गोडवे गायले. मात्र, हिंदुस्थान 70च्या आणि 80च्या दशकातही क्रिकेट सामने जिंकत होता. त्यावेळी विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता, असा टोमणाही गावसकरांनी लगावला. एवढय़ावरच न थांबता ते पुढे म्हणाले, ‘अनेकांना असे वाटते की, 2000 सालापासून हिंदुस्थानमध्ये क्रिकेट सुरू झाले. मात्र, त्यांना मला सांगावेसे काटते की, 1970 मध्येही ‘टीम इंडिया’ने परदेशात सामने जिंकलेले आहेत. 1986 सालीही हिंदुस्थानने इतर उपखंडातही सामने जिंकले. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानने परदेशात कसोटी मालिकाही अनिर्णित ठेवली आहे.